किरण लाड (नागोठणे)
नवसाला पावणारी नागोठणे गावाची ग्रामदैवता माता जोगेश्वरी व भैरवनाथ महाराजांचा चैत्र पालखी सोहळा बुधवार, दि. 24 एप्रिल म्हणजे आजपासून सुरु होत आहे. मातेच्या पालखी सोहळ्याची जय्यत तयारी उत्सव कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
नवसाला पावणारी, भक्तांच्या हाकेला ओ देणारी रायगड जिल्ह्यातील, रोहा तालुका येथील नागोठणे गावाची ग्रामदैवता जोगेश्वरी मातेचा पालखी सोहळा जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. श्री हनुमान जयंती झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून या पालखी सोहळ्याला नागोठणे गावातुन सुरुवात होऊन पालखीला मंदिरात जाण्यासाठी 72 तास लागतात. यावरुन या सोहळ्याची भव्यता लक्षात येते. जोगेश्वरी माता स्वयंभू प्रगटली आहे अशी जुनी अख्यायिका आहे.
नागोठणे हद्दीतील मुरावाडी येथील हिरु ताडकर हे नित्यनेमाने गुरे चारण्यासाठी डोंगर-पठारावर जात असत. एके दिवशी गुरे चारत असताना त्यांना कोणतरी हाक मारीत असल्याचा भास झाला. दुसऱ्या दिवशीही तसाच प्रकार घडला. त्यांनी आजुबाजुला बघितले तर तेथे कोणी नव्हतं. त्याच विचारात ताडकर घरी आले. रात्री झोपले असतांना देवीने स्वप्नात येऊन त्यांना दृष्टांत दिला आणि सांगितले कि, तु ज्या ठिकाणी गुरे चारण्यासाठी घेऊन येतोस त्या ठिकाणी मी आहे, व त्या ठिकाणी येऊन मला तुझ्या डोक्यावर घेऊन तूझ्या गावचे दिशेने निघ आणि ज्या ठिकाणावर आल्यावर मी तुला जड होईन त्याच जागेवर तु मला उभ्याने जमिनीवर टाकून दे, नेहमीप्रमाणे ताडकर गुरे चारण्यास डोंगर-पठारावर गेले असता देवीने स्वप्नात दिलेल्या दृष्टांताप्रमाणे पाषाण स्वरुपातील देवीची मुर्ती दिसली. हिरुंना आनंद झाला. श्रद्धेने हात जोडल्यावर देवीने दिलेल्या दृष्टांताची आठवण झाली त्यानुसार त्यांनी देवीची मुर्ती आपल्या डोक्यावर घेतली आणि मुरावाडी गावाच्या दिशेने निघाले.
नागोठणे येथील तीन तळ्याजवळ आले असता अचानक डोक्यावरची देवीची मुर्ती त्यांना जड वाटू लागली. त्याच क्षणी देवीने स्वप्नात दिलेल्या दृष्टांताची आठवण झाली आणि त्यांनी डोक्यावरची मुर्ती दुभंगेल या भीतीने उभ्याने न टाकता हळूच जमिनीवर ठेवण्याचा प्रयत्न केला परंतु, देवीच्या मुर्तीचा भार असह्य झाल्याने हिरु ताडकर यांना देवीच्या पायाशी मोक्ष प्राप्त झाला. तेव्हापासून नागोठण्याच्या निसर्गरम्य अशा तीन तळे बाजुला आणि मध्ये जोगेश्वरी माता, भैरवनाथ व व्याघ्रेश्वर महाराजांचे सुंदर, भव्य असे मंदिर उभे राहिले आहे. अशी जोगेश्वरी मातेची पुरातन अख्यायिका आहे. जोगेश्वरी मातेचे वर्षातुन दोन उत्सव साजरे केले जातात. एक नवरात्रोत्सव तर दुसरा चैत्र पालखी सोहळा. या पालखी सोहळ्याचे नागोठणेकर घरासमोर रांगोळ्या, पताका लावून, वाद्ये वाजवत, फटाके फोडत, नाचत, वाजतगाजत स्वागत करतात. या सोहळ्याच्या दिवशी जोगेश्वरी माता वर्षातून एकदा आपल्या घरी येते अशी ग्रामस्थांची गाढ श्रध्दा आहे. त्यामुळे बाहेरगावी नोकरी धंद्यानिमित्त गेलेले नागोठणेकर, माहेरवाशिणी आवर्जून या पालखी सोहळ्यासाठी उपस्थित असतात.
लाखो भाविक या दिवशी जोगेश्वरी मातेच्या पालखीचे दर्शन घेतात. जोगेश्वरी माता व भैरवनाथ महाराजांचा पालखी सोहळा नागोठणेकरांसाठी एक उत्सवाप्रमाणे आहे. या दिवसाची नागोठणेकर चातक पक्षाप्रमाणे आतुरतेने वाट पाहत असतात.
