अमुलकुमार जैन
रायगड : लोकसभा निवडणुक २०२४च्या अनुषंगाने रायगड जिल्ह्यातील म्हसळा पोलिस स्टेशन हद्दीत चोरी, घरफोडी करणारे अब्दुल करीम अब्दुल हमिद हळदे उर्फ लाला (रा. खोडा मोहल्ला, म्हसळा) आणि सैफ सईद खान उर्फ डाकु (रा. चोगले कॉप्लेक्स, म्हसळा) या दोन आरोपींना म्हसळा पोलिसांनी तडीपार केले असल्याची माहिती म्हसळा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पवन चौधरी यांनी दिली.
म्हसळा पोलीस ठाणे हद्दीतील अब्दुल करीम अब्दुल हमिद हळदे उर्फ लाला आणि सैफ सईद खान उर्फ डाकु यांचेवर म्हसळा पोलीस ठाणे तसेच रोहा पोलीस ठाणे, महाड शहर पोलीस ठाणे, तळा पोलीस ठाण्यात घरफोडी, चोरी या सारखे मालमत्तेचे व शरीराविरुध्दचे गुन्हे दाखल होते. आरोपीत यांचेवर वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करुन देखील त्यांचे गुन्हेगारी प्रवृत्तीत कोणत्याही प्रकारची सुधारणा होत नसल्याने तसेच आगामी येणारे सार्वत्रिक लोकसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने सदर आरोपीत यांचेवर उपविभागीय अधिकारी तथा कार्यकारी दंडाधिकारी श्रीवर्धन यांचे न्यायालयात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५६ (१) (अ) प्रमाणे हद्दपार करणे करीता प्रस्ताव सादर करण्यात आला होता. सदर प्रस्तावाचा वेळोवेळी पाठपुरावा करुन व कायदेशिर प्रक्रिया पार पाडले नंतर सदर आरोपीत यांना श्रीवर्धन उपविभागीय अधिकारी तथा कार्यकारी दंडाधिकारी महेश पाटील यांनी दिनांक १६/०४/२०२४ पासुन एक वर्ष कालावधीकरीता संपुर्ण रायगड जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.
सदरचा हद्दपार प्रस्ताव पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक मुगळीकर यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक पवन चौधरी प्रभारी अधिकारी म्हसळा पो. ठाणे, पोलिस शिपाई गणेश मुंडे यांनी तयार केला असुन हद्दपार प्रस्ताव तयार करणे करीता पोलिस शिपाई सानप, पोलिस शिपाई प्रकाश हंबिर, महीला पोलिस शिपाई वर्षा पाटील यांनी कामगिरी केली आहे.