26 एप्रिल रोजी पेणमध्ये जाहीर सभा!
मिलिंद माने
महाड : राज्यातील तिसऱ्या टप्प्यात ७ मे रोजी होणाऱ्या 32 रायगड लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा जंगी सामना रायगड लोकसभा मतदारसंघात होत असून राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष व विद्यमान खासदार सुनील तटकरे यांना रायगड लोकसभा मतदारसंघात होत असलेला विरोध पाहता त्यांच्या दिमतीला खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात उतरणार असून 26 एप्रिल रोजी पेणमध्ये जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्यातील तिसऱ्या टप्प्यात 32 रायगड, 35 बारामती, 40 उस्मानाबाद, 41 लातूर, 42 सोलापूर, 43 माढा, 44 सांगली, 45 सातारा, 46 रत्नागिरी-सिंधुदुर्ग, 47 कोल्हापूर, 48 हातकणंगले या 11 लोकसभा मतदारसंघासाठी ७ मे रोजी तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. 32 रायगड लोकसभा मतदारसंघात आजी-माजी खासदारांमध्ये सरळ लढत होत असून या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. राष्ट्रवादी अजित पवार यांच्या दृष्टीने रायगड लोकसभा मतदारसंघाची जागा त्यांनी प्रतिष्ठेची केली असून या मतदारसंघातून यदाकदाचित तटकरेंचा पराभव झाला तर राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात बॅक फुटला जाईल अशी शंका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटांमध्ये चर्चिली जात आहे. त्यामुळे तटकरेंना निवडून आणण्यासाठी भाजपाच्या सहकार्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तयारीला लागला आहे.
32 रायगड लोकसभा मतदारसंघात महाड, श्रीवर्धन, पेण, अलिबाग, दापोली व गुहागर या विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. परंतु रायगड लोकसभा मतदारसंघात मुस्लिम, कुणबी, आगरी-कोळी या समाजाच्या मतांवर विजयाचे गणित अवलंबून आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सुनील तटकरे यांना या सर्व समाजातील लोकांचा मोठ्या प्रमाणावर विरोध असल्याचे चित्र 32 रायगड लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघात पाहावयास मिळत आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व विद्यमान खासदार सुनील तटकरे यांना या वास्तवातील खरी गोम माहिती असली तरी नाक दाबून बुक्क्याचा मार त्यांना सहन करावा लागत असल्याचे त्यांच्याच कार्यकर्त्यांच्या तोंडून ऐकण्यास मिळत आहे.
सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीत विजय संपादन झाल्यानंतर या लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते सुनील तटकरेंवर नाराज असून त्यातच राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडल्याने मूळ राष्ट्रवादीच्या मतांमध्ये मोठ्या प्रमाणावर विभाजन झाले आहे. या लोकसभा मतदारसंघात मागील पाच वर्षात कोणतीही विकास कामे झालेली नाहीत. रस्ते, रेल्वे, औद्योगिकीकरण व बेरोजगार तरुणांचा प्रश्न, आगरी-कोळी बांधवांचा मच्छीमार समाजाचा प्रश्न, रायगड लोकसभा मतदारसंघातील धनगर वाड्यांचे प्रलंबित प्रश्न, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचा पंधरा वर्षापासून भिजत पडलेला प्रश्न यामुळे रायगडकर व रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, चिपळूणमधील नाराज कोकणवासीय जनता यासारख्या असंख्य प्रश्नांना तटकरे यांनी वाचा फोडली नसल्याचे बोलत आहे. या सर्वांच्या विरोधाला डावलून तटकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले असले तरी माजी खासदार अनंत गीते यांच्याशी त्यांना कडवी झुंज द्यावी लागणार आहे.
32 रायगड लोकसभा मतदारसंघातील श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील मोर्बा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पटाचे अध्यक्ष शरद पवार यांची मुस्लिम बहुसंख्य समाज असलेल्या मोहल्ल्यामध्ये झालेल्या 23 एप्रिल रोजीच्या जाहीर सभेमुळे मुस्लिम समाज तटकरेंपासून दुरावल्याचे चित्र सभेनंतर निर्माण झाले आहे. 32 रायगड लोकसभा मतदारसंघात मुस्लिम समाजाचा वाढता विरोध पाहता मुस्लिम समाजाला आश्वासन देण्यासाठी खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तटकरेंच्या मदतीला धावून आले असून तटकरेंसाठी त्यांनी रायगड जिल्ह्यातील पेण येथे शुक्रवारी 26 एप्रिल रोजी जाहीर सभा आयोजित केली आहे. या सभेनंतर 32 रायगड लोकसभा मतदारसंघातील गणित बदलते का? याची चाचपणी देखील या सभेनंतर होणारा असल्याची चर्चा या लोकसभा मतदारसंघात ऐकण्यास मिळत आहे.
32 रायगड लोकसभा मतदारसंघात 26 एप्रिल रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या होत असलेल्या सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासाठी भाजपा दक्षिण रायगड तयारीला लागला आहे. मात्र, विद्यमान खासदार सुनील तटकरे यांना असलेला ग्रामीण भागातील जनतेचा विरोध पाहता दक्षिण रायगडमधील भाजपा पदाधिकारी देखील हतबल झाले आहेत.
भावी खासदार होणार आमचे तटकरे साहेबच होणार पुनहा खासदार रायगड जिलहा चे