अनंत नारंगीकर
उरण : युनियन बँकेच्या कोप्रोली शाखेतील एका कर्मचाऱ्यानेच ६० लाख ४४ हजार २०० रूपयांचा अपहार केल्याची घटना उघडकीस आली असून या अपहार प्रकरणांमुळे बँकेच्या खातेदारांमध्ये खळबळ माजली आहे. अमोल सुधीर भुईबर असे या कर्मचाऱ्याचे नाव असून तो युनियन बँकेच्या कोप्रोली शाखेत विशेष सहाय्यक म्हणून काम करत होता. ही घटना उघडकीस आल्यानंतर अमोल भुईबर याच्यावर उरण पोलिस ठाण्यात रकमेचा अपहार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीमती कलावती जयराम पाटील आणि श्रीमती रंजना जयराम पाटील यांच्या युनियन बँकेत प्रत्येकी १० लाख रूपयांच्या मुदत ठेवी होत्या. अमोल यांनी या दोघींना या एफडी मोडण्यास सांगून नवीन एफडी करावयाची आहे असे सांगून त्यांच्या सह्या घेवून आणि त्यांना नवीन एफडी केल्याचा खोटा मेसेज पाठवला. पण प्रत्यक्षात त्याने ही रक्कम अमोल भूईबर याच्या आईच्या सुंगंधा भुईबर यांच्या खात्यात जमा केली. त्यानंतर त्याने ही रक्कम बँक ऑफ ईंडीया व इतर शाखेत भरणा केली. त्यानंतर बँकेतील लुज चेक कोणासही न सांगता बँकेचे अधिकारी सुनिल होवाळे यांचा संगणक वापरून २ लाख ५० हजार रूपये कनिष्क लालवाणी यांच्या मार्फत काढून घेतली. त्यानंतर त्यांनी बँकेचे कॅश रिसायकल मशिन (सीआरएम) मध्ये डिपॉझिट झालेल्या रक्कमेतून वेळोवेळी एकूण ४० लाख ४४ हजार २०० रूपये काढून घेतले. ही माहिती बँकेच्या लक्षात आल्यानंतर त्याच्यावर उरण पोलिस ठाण्यात एकूण ६० लाख ४४ हजार २०० रूपयांचा अपहार केल्याचा आणि बँकेची व खातेदारांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उरण पोलिस ठाण्याचे पोलिस अधिक तपास करत आहेत. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.