सलीम शेख
माणगांव : जगात खोटे बोलणारे कोण असतील तर ते शेकापचे जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड हे दोघेजण आहेत. तुम्ही शेकापचे प्रदेश सरचिटणीस झालात, १९५२ पासून या जिल्हयात लोकसभेच्या निवडणुका झाल्या तिथपासून कॉंग्रेस आणि तुमच्यात लढत झाली. तुम्ही नेतृत्व घेतलंत आणि या जिल्हयातून शेकाप हद्दपार झाला. २००९ मध्ये शेकाप निवडणूकीत शिवसेनेची लाचारी करत गेला, तुम्ही उमेदवारांना पाठिंबा दिलात. रायगड आणि मावळ मतदारसंघात चार आमदारांची बेगडी तुम्ही शिवसेनेच्या पदरात पाडलीत म्हणून तुम्हाला विधानसभेत यश मिळाले. त्या काळात बॅरिस्टर अंतुले यांचा पराभव झाला. बॅरिस्टर अंतुलेंचा फोटो लावण्याचा अधिकार तुम्हाला कुणालाच नाही. आयुष्यभर अंतुले यांचा द्वेष करत या रायगड जिल्हयात आलात पण जयंत पाटील तुम्ही अंतुले यांच्या कृपेमुळे त्याठिकाणी राहिलात हे तुम्ही विसरता कामा नये. अंतुले मुख्यमंत्री असताना त्यांनी जरा जरी नजर दाखवली असती तर शेकापचं अस्तित्व १९८० साली संपुष्टात आले असते. मनाचा दिलदारपणा अंतुलेनी दाखवला पण त्याच अंतुलेंच्या विरोधात तुम्ही काय काय बोलत आलात अशी घणाघाती टीका खा. सुनील तटकरे यांनी मोर्बा येथे पार पडलेल्या प्रचार सभेत केली.
माणगाव तालुक्यातील मोर्बा येथे दि. २३ एप्रिल रोजी सायंकाळी महायुतीचा अल्पसंख्याक मेळावा आयोजित करण्यात आला होता. या जाहीर मेळाव्याला शिवसेना प्रतोद आ. भरत गोगावले, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मुश्ताक अंतुले, बाबा सिद्दीकी, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला, अल्पसंख्याक सेल प्रदेशाध्यक्ष इद्रीस नायकवडी, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी, डॉ. मुश्ताक मुकादम, नजीब असवारे, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, शिवसेना प्रवक्ते ॲड. राजीव साबळे, माणगाव तालुका रा. काँ. अध्यक्ष सुभाष केकाणे, संपर्कप्रमुख अरुण चाळके, रा. काँ. विधानसभा अध्यक्ष चंद्रशेखर खानविलकर, युवक कार्याध्यक्ष शादाब गैबी, शिवसेना तालुकाप्रमुख ॲड. महेंद्र मानकर, अल्ताफ धनसे, मोर्बा सरपंच शौकत रोहेकर आदींसह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.