४० लाखांच्या काँक्रीटच्या रस्त्याला गेले तड
अनंत नारंगीकर
उरण : विंधणे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सर्वांगीण विकासासाठी उरणचे आमदार महेश बालदी यांनी ६ कोटी ६० लाखांचा निधी विविध विकासकामांसाठी मंजूर केला आहे. परंतु, उरण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एस. पी. वाठारकर, सरपंच निसर्गा रोशन डाकी, ग्रामविकास अधिकारी रवि गावंड यांच्या दुर्लक्षितपणामुळे सदरची विकास कामे ही अत्यंत निकुष्ट दर्जाची होत आहेत. त्यात विंधणे ते खालचा पाडा या मुख्य रस्त्याच्या काँक्रीटीकरणाला एक महिन्याच्या आतच तडे गेल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.


उरण तालुक्यातील श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून विंधणे ग्रुप ग्रामपंचायतकडे पाहिले जाते. अशा या ग्रामपंचायत हद्दीतील विविध प्रकारच्या विकास कामांसाठी आमदार महेश बालदी यांनी राज्य सरकारच्या माध्यमातून विंधणे ते बोरखार रस्ता डांबरीकरण करणे – ४ कोटी ५० लाख रुपये, विंधणे ते खालचा पाडा रस्ता काँक्रीटीकरण करणे – ४० लाख रुपये, बोरखार येथील रंगमंच सुशोभित करणे – २० लाख रुपये, बोरखार येथील सभामंडप बांधणे – १५ लाख रुपये, बोरखार येथील अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे – २० लाख रुपये, टाकीगाव येथील रस्ता काँक्रीटीकरण करणे – २० लाख रुपये, टाकीगाव येथे स्मशानभूमी बांधणे – १० लाख रुपये, धाकटी जुई येथे सभामंडप बांधणे – १० लाख रुपये, धाकटी जुई येथे अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे २० लाख रुपये, खालचा पाडा विंधणे येथील अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे २० लाख रुपये, विंधणे (बौध वस्ती) येथे अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे व स्ट्रीट लाईट बसवणे – ३० लाख रुपये निधी मंजूर करून दिला आहे.
मात्र, उरण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एस. पी. वाठारकर, बांधकाम विभागाचे अभियंता, विंधणे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच निसर्गा रोशन डाकी, ग्रामविकास अधिकारी रवि गावंड यांनी सुरु असलेल्या विविध कामाच्या अंदाजपत्रक, निविदा प्रक्रिया यांची माहिती न घेता सदर कामांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदारानी जनहितार्थ राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या विकास कामांना थूकपट्टी लावण्याचे काम केले आहे. त्यातच रहिवाशांच्या रहदारीचा मुख्य रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामाला तडे गेल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. तरी विंधणे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील विविध विकास कामांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी आता रहिवाशी व्यक्त करत आहेत.