• Mon. Jul 28th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

महाबळेश्वर आणि वरंध दोन्ही घाट पावसाळ्यात डेंजर झोनमध्ये येण्याची शक्यता!

ByEditor

Apr 26, 2024

सार्वजनिक बांधकाम आणि महामार्ग विभागाचा ढिसाळ कारभार!

चौथा पावसाळा तोंडावर असतानाही घाट दुरुस्तीची कामे प्रलंबितच?

मिलिंद माने
महाड :
पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणारे महाबळेश्वर आणि वरंध असे दोन्ही घाट वाहतुकीस धोकादायक बनले आहेत. सन २०२१ च्या पावसाळ्यात बाधित झालेला रस्ता यावर्षी देखील डेंजर झोनमध्ये असून तब्बल चार वर्षाने घाटातील दुरुस्तीच्या कामांना सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग विभागाने आता युद्ध पातळीवर सुरुवात केली असून या अजब कारभारावर स्थानिक रहिवाशी व पर्यटक व माल वाहतूकदारांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

संग्रहित

पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि पुणे या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या महाबळेश्वर आणि वरंधा भोर घाटाची सन २०२१ मधील अतिवृष्टीमध्ये दरड कोसळून व रस्ता खचून मोठी हानी झाली होती. या दोन्ही घाटात मोठ्या प्रमाणावर दरड कोसळल्याने हे दोन्ही घाट पूर्णपणे वाहतुकीस बंद झाले होते. संपूर्ण घाटात दरडी कोसळून घाट मार्ग तब्बल सहा महिने बंद होता. घाटात अनेक ठिकाणी भूस्खलन आणि भेगा पडल्याने महाबळेश्वर आणि वरंध घाट वाहतुकीस धोकादायक बनला होता. या घाटातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या होत्या (रस्त्यांना मधोमध तडे गेले होते) तर रस्त्यावर आलेल्या महाकाय दरडी, मातीचा भराव हटवून तात्पुरत्या स्वरूपात दुरुस्ती करण्यात आली होती.

संग्रहित

वरंध आणि महाबळेश्वर या दोन्ही घाटात महाड सार्वजनिक बांधकामाने काही अंशी कामे करून घाटातील वाहतूक सुरळीत केली होती. त्यानंतर वरंधा घाट हा राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे सुपूर्द केला आहे. तर महाबळेश्वर घाट महाबळेश्वर व पोलादपूर सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या अंतर्गत आलेल्या मार्गाची आजदेखील दुरवस्था आहे. ठीकठिकाणी कामे सुरु असून मातीचा भराव या पावसाळ्यात पुन्हा रस्त्यावर येण्याची शक्यता या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या पर्यटकांच्या व स्थानिक माल वाहतूकदारांच्या बोलण्यातून स्पष्टपणे जाणवत आहे.

सन २०२४ चा पावसाळा सुरू होण्यास फक्त एक महिन्याचा कालावधी शिल्लक असतानाही कामे अद्याप संथ गतीने चालू आहेत. महाबळेश्वर घाटातील प्रतापगडपासून महाबळेश्वरपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण जरी पूर्ण झाले असले तरी रस्त्यावरील २०२१ च्या नैसर्गिक आपत्तीमध्ये ज्या नदी नाल्यांवरील मोठ्या व लहान पुलांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन क्षतिग्रस्त झाले होते त्यांची कामे अत्यंत धीम्या गतीने चालू आहेत. मागील तीन वर्षाच्या काळात सार्वजनिक बांधकाम उपविभाग महाबळेश्वर यांनी डोळेझाक करून या कामांच्या पूर्ततेबाबत का गप्प बसले होते? असा प्रश्न निर्माण झाला आहे. उन्हाळ्यात येणाऱ्या पर्यटकांमुळे घाटमार्ग दुरुस्त करता आला नसल्याचे अजब उत्तर सार्वजनिक बांधकाम विभागाने दिले होते. या घाटात रस्त्यावर आलेल्या दरडी हटवण्यात आल्या असल्या तरी रस्त्याला लागून असलेल्या दगड आणि माती अद्याप काही ठिकाणी हटवण्यात आलेल्या नाहीत. महाबळेश्वर सार्वजनिक बांधकाम उपविभागाने दुरुस्तीच्या कामाला युद्धपातळीवर सुरुवात केल्याचे दाखवले आहे. यामध्ये प्रतापगडपासून महाबळेश्वरपर्यंतच्या रस्त्याचे नव्याने डांबरीकरण, सरंक्षक भिंती, गॅबियन पद्धतींच्या भिंती, नालेसफाई आदींचा समावेश आहे. अवाढव्य स्वरूपात आलेल्या मातीच्या आणि दगडी दरडी पाहता सद्यस्थितीत बांधत असलेल्या सरंक्षक भिंती आणि गॅबियन भिंती किती तग धरतील? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

महाड वरंध भोर पुणे पंढरपूर हा ब्रिटीशकालीन मार्ग आहे. या मार्गामुळे महाड आणि भोरमध्ये व्यापार आणि दळणवळण करणे स्थानिक जनतेला सोपे जाते. या मार्गावर असलेल्या घाटामुळे माझेरी, पारमाची पुढे भोर हद्दीतील शिलीम कुंड, राजीवडी, हिरडोशी, साळुंगण, उंबर्डेवाडी, शिरगाव या गावातील ग्रामस्थांना खरेदीसाठी बिरवाडी आणि महाडमध्ये येणे शक्य होते. शिवाय वैद्यकीय सुविधेसाठी देखील बिरवाडी आणि महाडला येणे जवळ आहे. वरंध घाटातून एसटी बस सुविधा असल्याने महाडला येणे आणि जाणे शक्य होत होते. पुणे प्रवासाचे अंतर कमी तासाचे असल्याने भाजी विक्रेते, एसटी बसेस, किरकोळ विक्रेते, पर्यटक याच मार्गाचा वापर करत आहेत. घाटातील सौंदर्य देखील ऐन पावसाळ्यात पाहण्याजोगे असते. यामुळे पर्यटनाला देखील चालना मिळत गेली. यामुळे भोर महाड सीमेवरील गावांतील ग्रामस्थांना यामुळे रोजगार देखील प्राप्त झाला आहे. मात्र, दरवर्षी या घाटात सातत्याने दरडी कोसळत असल्याने हा मार्ग धोकादायक बनतो. त्यातच आता दुरुस्तीच्या आणि रुंदीकरणाच्या कामासाठी हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद केल्याने या परिसरातील नागरिकांची व मालवाहतूकदार, भाजीपाला वाहतूकदार यांची मोठ्या प्रमाणावर कोंडी झाली आहे.

मागील तीन वर्षापासून या घाटात दुरुस्तीचे काम चालू आहे, तरी देखील ते काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यातच हा महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे हस्तांतरित केला आहे. महाबळेश्वर घाटात सन 2021 च्या पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीने नुकसान झाले होते. सातारा जिल्ह्याच्या प्रतापगडच्या हद्दीपासून महाबळेश्वरपर्यंतच्या रस्त्याच्या नव्याने डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले असले तरी पुढील वर्षी या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याचे काम हाती घेतले जाईल असे सार्वजनिक बांधकाम विभाग महाबळेश्वरचे उपविभागीय अभियंता अजित देशपांडे यांनी सांगितले. मात्र आधीच पर्यटनाच्या दृष्टीने थंड हवेचे ठिकाण असणाऱ्या महाबळेश्वरला सध्याचे तापमान 36 ते 39 अंश डिग्रीपर्यंत असल्याने पर्यटकांनी महाबळेश्वरकडे पाठ फिरवली आहे. त्यातच महाबळेश्वर, पाचगणी व वाईमध्ये मोठ्या प्रमाणावर सिमेंट काँक्रीटच्या हॉटेल व लॉजिंग बोर्डिंगसाठी असणाऱ्या इमारती व स्थानिक रहिवाशांनी देखील सिमेंट काँक्रीटच्या इमारती उभारल्याने महाबळेश्वरमधील थंड हवेचे प्रमाण कमी झाले आहे.

त्यातच पोलादपूर तालुक्यापासून महाबळेश्वर पर्यंतच्या 40 किलोमीटरच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण झाल्यास येथील तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ होऊन महाबळेश्वरमधील थंड हवेचे केंद्र नष्ट करण्याचा डाव सार्वजनिक बांधकाम विभागाने आखल्याचे महाबळेश्वरमधील अनेक रहिवाशांकडून दबक्या आवाजात बोलले जात आहे.

पोलादपूर महाबळेश्वर वाई शिरूर हा रस्ता डांबरीकरणाचा असल्याने उन्हाळ्यात या रस्त्यामुळे तापमानात वाढ जरी झाली तरी लागलीच कमी होते. मात्र, काँक्रिटीकरण झाल्यास महाबळेश्वर पाचगणी व वाई येथील तापमानाचा पारा 45 अंशापर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे महाबळेश्वर वाई पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण काही काळातच लोप पावण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!