मिलिंद माने
महाड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर महाड तालुक्यातील वहूर गावाच्या हद्दीत 26 एप्रिल रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास एका मोटरसायकलला झालेल्या अपघातात मुंबई डोंबिवली येथील एक इसम जागीच ठार झाला आहे. तर एक प्रवासी किरकोळ जखमी झाला आहे.
महेंद्र दामोदर नाकते (३०) आणि दिगंबर माळजी नाकते (४०) दोघे रा. मुंबई डोंबिवली हे दोघे मोटरसायकल क्र. एमएच०५ सीडब्लू ७५१६ चिपळूण ते मुंबई डोंबिवली असा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाने प्रवास करत असता महाड तालुक्यातील वहुर गाव हद्दीत आल्यानंतर मोटरसायकल चालक महेंद्र नाकते याचा गाडीवरून ताबा सुटला आणि गाडी ५०० फूट रस्त्यावर घसरत गेली. मोटरसायकलच्या मागे बसलेले दिगंबर नाकते हे रस्त्यावर आपटल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर चालक महेंद्र हे किरकोळ जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक शाखा पोलीस महाड यांनी घटनास्थळी धाव घेत अपघातातील वाहन बाजूला करत जखमी यांना महाड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी भरती केले.
