मुंबईतील नेत्यांकडून आमिष दाखवून देखील मतदार आपल्या निर्णयावर ठाम; राजकीय नेते धास्तावले?
मिलिंद माने
महाड : 32 रायगड लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष व विद्यमान खासदार सुनील तटकरे आणि इंडिया आघाडीकडून माजी खासदार शिवसेनेचे अनंत गीते रिंगणात आहेत. या दोन्ही नेत्यांबद्दल जरी रायगड लोकसभा मतदार संघामध्ये नाराजी असली तरी लढत मात्र या दोघांमध्येच राहणार असल्याचे चित्र स्पष्ट आहे.
विद्यमान खासदार सुनील तटकरेंना निवडून येण्यासाठी मुस्लिम, बौद्ध , कुणबी व मराठा समाजाच्या मतांची टक्केवारी निर्णायक ठरणार आहे. मात्र, मुंबईतील त्यांच्या पक्षाच्या व महायुतीच्या नेत्यांकडून ग्रामीण भागातील मतदारांना विविध प्रकारची आमिषे दाखवून देखील मतदार आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे. चित्र 32 रायगड लोकसभा मतदारसंघातील महाड, श्रीवर्धन, पेण, अलिबाग, दापोली व गुहागर या विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात दिसून येत आहे.
32 रायगड लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघात जे भाजपच्या बरोबर ते आमचे शत्रू अशी धारणा ग्रामीण भागातील मतदारांची झाल्यामुळे किंबहुना तसे चित्र ग्रामीण भागात पावलोपावली नाक्यानाक्यावर व चहाच्या टपऱ्या, वडापाव विक्रेते, चिकन सेंटर, सरबताच्या गाड्या, गावठी दारूचे अड्डे, एसटी बस स्टॉप, तीन व सहा आसनी रिक्षा बस स्टॅन्ड, मच्छी-मटन मार्केट या सर्व ठिकाणी भाजपाच्या विरोधात सूर ऐकण्यास मिळत आहे. याचा फटका विद्यमान खासदार व राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना बसत असून त्यामुळे त्यांच्या गडाला धोका निर्माण झाला आहे.
32 रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये सुनील तटकरे हे पुन्हा एकदा खासदारकीसाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यापूर्वी राज्य सरकारमध्ये विविध मंत्री पदे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी भूषवली आहेत. रायगड जिल्हा परिषद सदस्य ते कॅबिनेट मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद अशी विविध पदे सुनील तटकरे यांनी सांभाळली आहेत. मात्र, राजकारण करताना सुनील तटकरे यांनी आपल्या सोबत काम करणाऱ्या गुहागर, खेड, दापोली, महाड, पोलादपूर, श्रीवर्धन, माणगाव, रोहा, पेण, अलिबाग या तालुक्यातील व 32 रायगड लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघातील विविध पक्षाच्या नेत्यांना आणि निवडणुकीसाठी सोबत असलेल्या पक्षांना धोका देत आपला स्वार्थ साधण्याचे काम त्यांनी यापूर्वी व आत्ता देखील केलं आहे. त्यांच्या या राजकीय खेळीबाबत अनेक वेळा रायगड जिल्ह्यासह रत्नागिरी जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी व सर्वपक्षीय स्थानिक आमदारांनी खालच्या पातळीवर जाऊन सुनील तटकरे व त्यांची कन्या आदिती व पुत्र अनिकेत तटकरे यांच्यावर जहरी टीका करून रान उठवले होते.
रायगड जिल्ह्यातील प्रभावी नेतृत्व म्हणून सुनील तटकरे यांच्याकडे पाहिले जाते. मात्र, मध्यंतरीच्या काळामध्ये त्यांच्यावर जलसंपदा विभागातील भ्रष्टाचाराबाबत टीका टिप्पणी झाली होती. यातून वाचण्यासाठीच सुनील तटकरे यांनी भाजपची साथ धरल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील ग्रामीण भागातील स्वपक्षीय कार्यकर्त्यांपासून ते पदाधिकाऱ्यांपर्यंत व विरोधी पक्षाकडून केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष व विद्यमान 32 रायगड लोकसभा मतदारसंघातील खासदार सुनील तटकरे यांनी शरद पवारांची साथ सोडल्यानंतर आणि भाजप बरोबर हात मिळवणी केल्यामुळे रायगड लोकसभा मतदारसंघातील महाड, श्रीवर्धन, पेण, अलिबाग, दापोली व गुहागर या विधानसभा मतदारसंघातल्या ग्रामीण भागातील कुणबी, बौद्ध मराठा, आगरी-कोळी, वैश्यवाणी, धनगर, सुतार या समाजातील ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेमध्ये पावलोपावली, गावोगावी, वाड्या-वस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर नाराजी निर्माण झाली आहे. ही नाराजी या निवडणुकीत मतदानाच्या माध्यमातून मतदार काढतील असा संशय निर्माण झाल्याने महायुतीकडून भाजपचे बडे नेते रायगड लोकसभा मतदारसंघात तळ ठोकून आहेत.
दुसरीकडे शिवसेनेचे सलग तीन वेळा खासदार राहिलेले अनंत गीते यांनी रायगड लोकसभा मतदारसंघात जनतेला अपेक्षित अशी कामगिरी केलेली नाही. जिल्ह्यातील विकासाच्या दृष्टीने मोठमोठे प्रकल्प आणणे आवश्यक होते ते प्रकल्प जिल्ह्यामध्ये त्यांना देखील आणता आले नाही. याबाबत देखील अनंत गीते यांच्याबाबत नाराजीचा सूर असला तरी दगडापेक्षा वीट मऊ असा विचार मतदारांनी करून भाजपबरोबर गेलेल्यांना साथ द्यायची नाही असा ठाम निर्णय रायगड लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी घेतल्याचे चित्र 32 रायगड लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघातून आढावा घेतल्यावर जागोजागी दिसून येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुंबई, ठाण्यातील नेते गावागावात जाऊन विविध प्रकारची आमिष दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, ती आमिष तुमच्याकडेच ठेवा आम्हाला गीते यांनाच निवडून आणायचे आहे अशा शब्दात राष्ट्रवादी नेत्यांना खडे बोल गावोगावी वाड्या-वाड्यांवर सुनावले जात आहेत. एकीकडे महाडचे शिंदे गटाचे आमदार गोगावले यांनी यापूर्वी विद्यमान खासदार सुनील तटकरे व त्यांची कन्या राज्यातील मंत्री आदिती तटकरे यांच्यावर टीकेची झोड उठवली होती आणि मोदींना पाठिंबा देण्यासाठी गीते यांना मतदान करा असे आवाहन केले होते. तेच गोगावले आता शिंदे गटात गेल्याने मोदींना पाठिंबा देण्यासाठी सुनील तटकरे यांना मतदान करा असे गावोगावी सांगत आहेत. त्यांच्या या दुटप्पी आवाहनामुळे ग्रामीण भागातील जनता संभ्रमात पडली आहे. लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी जे तटकरेंना विरोध करत होते तेच आज तटकरेंबरोबर आहेत. त्यामुळे आम्ही नक्की समजायचे काय? असा सवाल करीत लोकसभेला तुमचा एक निर्णय व विधानसभेला तुमचा दुसरा निर्णय या भूमिकेमुळे मतदार नाराज झाले आहेत.
32 रायगड लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांबाबत ग्रामीण भागातील मतदार गावोगावी, वाड्यावर येणाऱ्या मुंबईतील पांढऱ्या शुभ्र गाड्यातील व पांढऱ्या कपड्यातील पुढार्यांना तोंडावर कोणीही बोलत नसले तरी मत पेटीतून ही नाराजी व्यक्त होणार असल्याचे सांगितले जात आहे. भाजप विरोधी वातावरणाचा फटका सुनील तटकरे यांना बसण्याची दाट शक्यता आहे. गीते यांच्याबाबत देखील नाराजी आहे. मात्र, सुनील तटकरे यांच्यासमोर तगडा उमेदवार म्हणून गीते यांच्याकडे पाहिले जात आहे. यामुळे नाईलाजास्तव गीते यांना पाठबळ मिळण्याची शक्यता आहे. कुणबी, मुस्लिम समाजामध्ये गीते यांचे चांगले संबंध आहेत. याचा फायदा गीते यांना मिळण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीचे मुस्लिम समाजाचे नेते देखील महाड तालुक्यामध्ये गावोगाव फिरले. तटकरे साहेबांना मदत करा असे आव्हान देखील केले. मात्र, भाजपला ज्यांचा ज्यांचा पाठिंबा आहे त्यांना आमचा विरोध राहील असे मतदारांकडून सांगण्यात आल्याचे बोलले जात आहे. स्थानिक पातळीवरील राष्ट्रवादीचे नेते, आठवले गटाचे पुढारी गावोगावी, वाड्या-वस्त्यांवर फिरत आहेत. मात्र, मुस्लिम, बौद्ध, मराठा व कुणबी समाजामध्ये त्यांना फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे आता मुंबईतील नेत्यांकडून वेगवेगळी आमिष दाखवण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, ही आमिष देखील धुडकावली जात आहेत.
महाडमधील मराठा समाजाचे नेते तटकरेंसाठी धावले मात्र, मतदार तटकरेंपासून दुरावला?
महाड तालुक्यातील मराठा नायक समाजाच्या बहुउद्देशीय हॉलसाठी आज महाडमध्ये झालेल्या मराठा नायक समाजाच्या मीटिंगमध्ये तटकरे यांनी निवडणुकीपूर्वी व निवडणुकीनंतर मदत समाजाच्या बहुउद्देशीय हॉलच्या बांधकामासाठी देण्याचे मान्य केल्याने तटकरेंना मदत कण्याचा निर्णय महाड तालुका मराठा नायक समाजाच्या आज झालेल्या बैठकीत झाला असला तरी हा पुढाऱ्यांनी घेतलेला निर्णय आहे. मात्र, तो निर्णय मराठा समाजातल्या गाव पातळीवरील कार्यकर्त्यांना मान्य आहे का? असा सवाल या बैठकीनंतर अनेक मराठा समाजातील पदाधिकारी आपापसात याबाबत चर्चा करताना ऐकावयास मिळत होता.
32 रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार व विद्यमान खासदार तटकरे यांच्या प्रचारासाठी व मतांच्या जोगव्यासाठी मुंबईतील महायुतीचे नेते कुणबी, मुस्लिम, बौद्ध व मराठा या समाजाच्या गावोगावी, वाड्यांवर फिरत असले तरी त्यांच्या हाती मात्र बरोबर असलेल्या पांढऱ्या पेशी पुढार्यांच्या व्यतिरिक्त काहीच लागत नसून मतदार हा आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे चित्र 32 रायगड लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघातील गावोगावी जाऊन घेतलेल्या आढाव्यानंतर समोर येत आहे. एकंदरीत मतदारांच्या मनात काय आहे? हे निकालानंतरच कळेल.