प्रतिनिधी
मुरुड-जंजिरा : आदिवासी वाड्यावस्त्यांवर मेडिकल सेवा वेळेवर मिळत नसल्यामुळे अनेकजण अजारांना बळी पडतात. या गंभीर समस्येची दखल घेत पीएम जनमन योजनेअंतर्गत मुरुड-जंजिरा येथे मोबाईल मेडिकल यूनिट (एमएमयू) सेवा सुरू करण्यात आली आहे. बुधवारी (दि.१) मुरुड येथे गटविकास अधिकारी राजेंद्रकुमार खताळ यांच्या हस्ते या सेवेचे उद्घाटन करण्यात आले.
पीएम जनमन अंतर्गत मुरुड तालुक्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागांमध्ये आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी मोबाईल मेडिकल युनिटची सुरुवात दि. १ मे २०२४ रोजी करण्यात आली. यावेळी पंचायत समिती मुरुड-जंजिराचे गटविकास अधिकारी राजेंद्रकुमार खताळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पायल राठोड, पं. स. विस्तार अधिकारी श्री. वाणी, मोबाईल मेडिकल युनिट मुरुडचे वैद्यकीय अधिकारी सतिश्चंद्र कीर, आरोग्य सेवक राजेंद्र चुनेकर, लेखापाल नंदकुमार घाडगे, तालुका समुह संघटक प्राची चौलकर, मोबाईल मेडिकल युनिटचे सर्व सदस्य व पंचायत समितीचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
मोबाईल मेडिकल युनिट अंतर्गत वैद्यकीय चमुव्दारे अदिवासी गाव व पाड्यातील सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी तसेच त्यांना शासनाच्या आरोग्यविषयक सर्व योजनांची माहीती देणे व मदत करणेबाबत नियोजित असल्यामुळे तालुक्यातील अदिवासी बांधवांना घरपोच आरोग्य सेवा मिळणार आहेत. तालुक्यातील ग्रामस्थ यांनी या टिमला सहकार्य करुन वैद्यकीय सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन मुरुड तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पायल राठोड यांनी केले आहे.