किरण लाड
नागोठणे : 32 रायगड लोकसभेचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या निवडणूक प्रचारार्थ नागोठणे येथील गांधी चौकात उद्या सायंकाळी 5 वाजता प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले आहे. उद्याच्या प्रचार सभेत तटकरे काय बोलतात? याकडे तमाम नागोठणे विभागातील मतदारांचे लक्ष लागले आहे.
१८व्या लोकसभेसाठी रायगड लोकसभेसाठी ७ मे रोजी निवडणूक होणार आहे. रायगड लोकसभेच्या निवडणुकीसाठी एकुण १३ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे असले तरी खरी लढत महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे व इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्यातच होणार आहे. पेण, अलिबाग, श्रीवर्धन, महाड, दापोली, गुहागर या लोकसभेच्या सहा विधानसभा मतदारसंघात प्रचार शिगेला पोहचला आहे. अनंत गीते यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीचे नेते देशाचे माजी सरक्षणमंत्री शरद पवार, माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे तर शेकापचे नेते आमदार जयंत पाटील रिंगणात उतरले आहेत. तर महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारसभेसाठी शिवसेना नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार आदी प्रमुख नेते मैदानात उतरले आहेत. रायगड लोकसभा निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. नागोठणे येथे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारसभेसाठी पेण, सुधागडचे आमदार रविशेठ पाटील, माजी आमदार भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील, भाजपचे रायगड लोकसभा प्रमुख सतीश धारप, आमदार अनिकेत तटकरे, पेण विधानसभेचे प्रमुख प्रसाददादा भोईर तसेच जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी, शिवसेनेचे (शिंदे गट) प्रमुख पदाधिकारी, मनसेचे प्रमुख पदाधिकारी, आरपीआय आठवले गटाचे प्रमुख पदाधिकारी, रासपचे प्रमुख पदाधिकारी तसेच महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
नागोठण्यातील प्रसिद्ध गांधी चौकात महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांची प्रचारसभा मागील काही दिवसांपूर्वी झाली होती. त्या सभेला प्रत्युत्तर म्हणून महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे उद्याच्या प्रचारसभेत काय बोलतात याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.