माणगाव येथे आ. भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थित केला जाहीर प्रवेश
सलीम शेख
माणगाव : महाड,पोलापूर माणगावचे आमदार भरत गोगावले यांच्या विकासकामांनी प्रभावित होऊन माणगाव तालुका शेकाप चिटणीस रमेश मोरे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शेकापला रामराम करीत आ. भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत कुणबी भवन हॉल माणगाव याठिकाणी झालेल्या कार्यक्रमात शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. यावेळी रायगड लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार खा. सुनील तटकरे उपस्थित होते.
शेकापचे तालुका चिटणीस रमेश मोरे व त्यांच्या समवेत आलेल्या शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेशाचा कार्यक्रम सोमवार, दि. २९ एप्रिल रोजी कुणबी भवन हॉल माणगाव याठिकाणी उत्साहात संपन्न झाला. यावेळी रमेश मोरे यांच्या समवेत खरवली भागातील तसेच मोर्बा जिल्हा परिषद गटातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, कार्यकर्ते यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी आ. भरत गोगावले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन त्यांनी केलेल्या विकासकामांनी प्रभावित होऊन शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. या कार्यक्रमास खा. सुनील तटकरे उपस्थीत होते. तसेच शिवसेना प्रवक्ते ॲड. राजीव साबळे, राष्ट्रवादी काँग्रेस महाड विधानसभा मतदार संघ अध्यक्ष बाबूशेठ खानविलकर, नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, तालुका प्रमुख ॲड. महेंद्र मानकर, युवासेना जिल्हा प्रमुख विपुल उभारे, जिल्हा महिला आघाडी प्रमुख नीलिमा घोसाळकर, माजी सभापती महेंद्र तेटगुरे, सुजित शिंदे, माजी उपसभापती रामभाऊ म्हसकर, माजी उपनगराध्यक्ष रत्नाकर उभारे, माजी पंचायत समिती सदस्य सुधीर पवार, नगरसेवक सचिन बोंबले, माजी नगरसेवक नितीन बामगुडे, शहरप्रमुख सुनील पवार, ॲड. सुशील दसवते, प्रताप घोसाळकर, युवासेना तालुकाप्रमुख राजेश कदम, विरेश येरुणकर, प्रसाद धारिया, संघटिका अरुणा वाघमारे, उपतालुका संघटिका सुवर्णा जाधव, विनोद सुतार यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमात आपल्या मार्गदर्शनात बोलताना सुनील तटकरे यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात आपल्याला ४५ पेक्षा जास्त जागा जिंकायच्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची गौरवशाली वाटचाल सुरु आहे. या देशाचे संविधान चंद्र, सूर्य असेपर्यंत राहणार आहे. विरोधक या बाबतीत अपप्रचार करीत आहेत. अनंत गीते कोविड, निसर्ग चक्रीवादळ, महापूर या संकटकाळात कुठे होते? याचा जाब जनतेने विचारायला हवा. या संकटकाळात मी असेन, आ. भरत गोगावले, अदिती, अनिकेत असे आम्ही सारी मंडळी लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारीने जनतेवर आलेल्या संकटात उभे राहून संकटग्रस्तांना मदत पुरविण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करीत होतो. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या पाठीशी जनता असते. भरतशेठनी जादू करीत रमेश मोरे यांना शिवसेनेत घेऊन जयंत पाटील यांना धक्का दिला असे सांगत रायगड लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार म्हणून मला प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन केले.
आ. भरत गोगावले यावेळी बोलताना म्हणाले कि, सुरवातीलाच मी रमेश मोरे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे शिवसेना पक्षात स्वागत करतो. प्रवेशकर्त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा न जाऊ देता आपली जी काही विकासाची कामे राहिली असतील ती सर्व कामे माझ्या तसेच सुनील तटकरे, अदिती तटकरे यांच्यामाध्यमांतून पूर्ण केली जातील असे आश्वासित केले. आ. गोगावले पुढे म्हणाले कि, येत्या ७ मे रोजी रायगड लोकसभा मतदार संघाची निवडणूक असून या निवडणुकीसाठी आम्हाला तुमच्या सर्व प्रवेशकर्त्यांची आवश्यकता होती. आपण देशाच्या हितासाठी मतदान करणार आहोत. यासाठी आपल्याला रायगडचा शिलेदार म्हणून सुनील तटकरेंना निवडून दिल्लीला पाठवायचे आहे. ४०० पारचा आकडा देशात आपल्याला गाठायचा असून महाराष्ट्रात ४५ पेक्षा अधिक जागा जिंकायच्या आहेत. यासाठी सुनील तटकरे यांना बहुमतांनी विजयी करा असे आवाहन त्यांनी केले.
प्रवेशकर्ते रमेश मोरे यावेळी बोलताना म्हणाले कि, आ. भरतशेठ गोगावले यांच्या विकासकामांनी भारावून आम्ही सर्वांनी शिवसेनेत प्रवेश केला. मी शेकापत असतानाही भरतशेठनी माझी सव्वाकोटी रुपयांची विकासकामे केली. मतदार संघाचा विकास करायचा असेल तर भरतशेठ यांच्याशिवाय पर्याय नाही. हे विचारात घेऊन आम्ही सर्वांनी शिवसेनेत प्रवेश केला. प्रास्ताविकात बोलताना शिवसेना माणगाव तालुकाप्रमुख ॲड. महेंद्र मानकर म्हणाले कि, विरोधकांकडे विकासाचा कोणताही मुद्दा नाही. ते जाती, धर्मात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यालाच कंटाळून रमेश मोरे व त्यांचे सहकारी शेकाप सोडून शिवसेनेत आले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यात वेगाने विकासाची कामे करीत आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जाणारे आ. भरत गोगावले हे मतदार संघात वेगाने विकासाची कामे करीत आहेत. कोट्यावधी रुपयांची विकासकामे आ. गोगावले यांनी केली आहेत. ते गोरगरीब, सर्वसामान्य जनतेसाठी वेळ देत असतात. त्याची पोचपावती त्यांना मिळत आहे. अनंत गीते व सुनील तटकरे यांची तुलना केली तर सुनील तटकरे यांनी भरपूर विकासाची कामे रायगड लोकसभा मतदार संघात केली आहेत. अनंत गीतेंनी ६ वेळा खासदार व २ वेळा केंद्रात मंत्री होऊनहि त्यांना काही विकास करता आला नाही. यासाठी पुन्हा एकदा आपल्याला खा. तटकरे यांना निवडून द्यायचे असल्याचे सांगून प्रवेशकर्ते रमेश मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांचे शिवसेना पक्षात स्वागत केले.