दोन संजोग पाटलांसह 33 उमेदवार लोकसभेच्या रिंगणात
घनःश्याम कडू
उरण : मावळ लोकसभा मतदार संघात माघारीनंतर लढतीचे चित्र स्पष्ट झाले असून, 33 उमेदवार शर्यतीत असले, तरी खरी लढत ही तिरंगीच असणार आहे. दरम्यान, 33 उमेदवारांसाठी आता इव्हीएमच्या तीन मशिन मतदानाकरिता मावळमध्ये लागणार आहेत. मावळमध्ये 33 उमेदवारांमध्ये तब्बल 18 अपक्ष असून, तीन मुख्य व मोठ्या पक्षाचे, तर उर्वरित छोट्या पक्षांचे उमेदवार आहेत. त्यामुळे खरी लढत ही 2019 प्रमाणेच आघाडीचे संजोग वाघेरे-पाटील, महायुतीचे श्रीरंग बारणे आणि वंचितच्या माधवी जोशी अशी होणार आहे. गतवेळी वंचितच्या राजाराम पाटील यांनी 75 हजार मते घेतली होती. या वेळीही वंचितने पुन्हा आगरी कार्ड खेळत घाटाखालील कर्जतच्या जोशी यांना उमेदवारी दिली आहे. पण, यावेळी त्यांना एमआयएमची साथ नसल्याने जोशी या पाऊण लाखापेक्षा कमी मते घेतील, असा अंदाज आहे.
या रिंगणात दोन वाघेरे आणि दोन संजोग होते. त्यातील संजय वाघेरे (नाशिक) यांचा अर्ज छाननीत बाद झाल्याने ठाकरेंचा मावळा (आघाडीचे उमेदवार) संजोग वाघेरे-पाटील यांचे निम्मे टेन्शन कमी झाले होते. पण, शिंदे शिवसेनेने उभे केलेले उरणचे दुसरे संजोग पाटील यांनी अर्ज मागे न घेतल्याने आता दोन संजोग शर्यतीत राहिले आहेत. त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना शिंदे शिवसेनेचा एक पदाधिकारी देखील हजर होता.
मावळमध्ये ‘रायगड पॅटर्न’
आघाडीच्या संजोग वाघेरेंची मते खाण्यासाठी मावळमध्ये रायगड पॅटर्न राबविण्यात आला होता. पण, त्याला निम्मेच यश आले. कारण आघाडीच्या वाघेरेंच्या नावाशी साधर्म्य असलेल्या दोघांपैकी संजय वाघेरेंचा अर्ज छाननीतच बाद झाला. संजोग पाटील मात्र शर्यतीत राहिले. त्यामुळे घाटावरील पिंपरी-चिंचवडचे संजोग वाघेरे-पाटील आणि घाटाखालील उरणचे संजोग पाटील असे दोन संजोग पाटील शर्यतीत राहिले आहेत. त्यामुळे ते पिंपरीच्या आघाडीच्या पाटलांची किती मते खातात हे 4 तारखेलाच कळणार आहे.