• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या हेलिकॉप्टरला अपघात; स्थानिक प्रशासनाचा ढिसाळ कारभार उघड

ByEditor

May 3, 2024

मिलिंद माने
महाड :
शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे गुरुवारी २ मे रोजी महाड येथे ३२ रायगड लोकसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार माजी मंत्री अनंत गीते यांच्या प्रचार सभेसाठी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी रोहा येथे पुन्हा प्रचार सभेसाठी जाणार होत्या. ज्या हेलिकॉप्टरने त्या जाणार होत्या त्या हेलिकॉप्टरचे लँडिंग होत असतानाच हेलिकॉप्टर कोसळले. सुदैवाने या अपघाता दरम्यान सुषमा अंधारे या बाहेरच होत्या. हेलिकॉप्टरचा पायलट नितीन वेल्डे मात्र किरकोळ जखमी झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, ३२ रायगड लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारासाठी शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे या महाड येथे आल्या होत्या. रात्री प्रचार सभा संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी ३ मे रोजी त्या रोहा येथे जाण्यासाठी निघाल्या. त्यांची जाहीर प्रचार सभा रायगड जिल्ह्यातल्या रोहा येथे असल्याने त्यांना सकाळी घेण्यासाठी महालक्ष्मी एव्हिएशन प्रॉडक्ट लिमिटेड, हडपसर पुणे या कंपनीचे हेलिकॉप्टर महाड येथे आले. मात्र, ज्या चिचकर ग्राउंडवर हेलिकॉप्टर उतरणार होते त्या ठिकाणी एच मार्किंग असलेले कोणतेही निशाण बनवण्यात आले नव्हते. परिणामी हेलिकॉप्टर पायलेट नितीन वेल्डे याने सुमारे पाच ते सहा वेळा महाड शहरापर्यंत घिरट्या घालून हेलिकॉप्टर उतरण्याचे ठिकाण शोधले. मात्र, त्यावेळी हेलिकॉप्टर लँडिंग होत असताना ते क्रॅश झाले व कोसळले. यामध्ये हेलिकॉप्टरचा पायलेट जखमी झाला आहे.

महाड येथील चिचकर ग्राउंडमध्ये ज्या वेळेला हेलिकॉप्टर कोसळले त्यावेळेला हेलिकॉप्टरच्या प्रतीक्षेत बसलेल्या शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे व त्यांचा भाऊ एक कारमध्ये बसून होते. हेलिकॉप्टर हवेतून जमिनीवर उतरताना भरकटले आणि जमिनीवर आपटले. हेलिकॉप्टर खाली कोसळता क्षणी त्यातील पायलटला वाचवण्यासाठी सुषमा अंधारे या कारमधून घटनास्थळी धावत निघाल्या. मात्र, त्यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या पोलिसांनी त्यांना रोखले.

ज्यांची चुकी आहे त्यांच्यावर कारवाई व्हावी –कार्यकर्त्यांची मागणी

हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे समोर आले आहे. हेलिकॉप्टर लँडिंग होत असताना क्रॅश झाले. या हेलिकॉप्टरमधून सुषमा अंधारे आणि त्यांचा भाऊ आणि पायलट नितीन वेल्डे असे तिघेजण प्रवास करणार होते. मात्र, प्रवासाच्या आधीच सदरची घटना घडल्याने यामध्ये नक्की चुकी कोणाची याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महाडचे माजी नगराध्यक्ष संदीप जाधव व महाडचे माजी विरोधी पक्षनेते चेतन उर्फ बंटी पोटफोडे यांनी या झालेल्या प्रकाराबाबत गंभीर आक्षेप घेतले आहेत. याबाबत हेलिकॉप्टरची उतरण्याची जागा व त्या ठिकाणी एच मार्किंग नसणे ही गंभीर घटना असून हेलिकॉप्टर लँडिंग होण्याबाबतची सर्व तयारी सार्वजनिक बांधकाम विभागाने करायची असते. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेश नामदे यांना तात्काळ निलंबित करावे तसेच याप्रकरणी संबंधित उपअभियंता व शाखा अभियंता यांची देखील चौकशी करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महाडचे माजी नगराध्यक्ष संदीप जाधव व माजी विरोधी पक्षनेता चेतन उर्फ बंटी पोटफोडे यांनी केली आहे

गाजलेली सभा आणि हेलीकॉप्टरचा अपघात; कार्यकर्त्यांना संशय

३२ रायगड लोकसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार माजी मंत्री अनंत गीते यांच्या प्रचारासाठी शिवसेना उपनेते सुषमा अंधारे यांची सभा काल महाड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात झाली होती. या सभेला महाड तालुक्यातील नागरिकांनी व शिवसैनिकांनी तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट, आप व मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. या सभेत सुषमा अंधारे यांचे भाषण गाजले होते. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्याची चर्चा या सभेनंतर महाडसह रायगड जिल्ह्यात होऊ लागली होती. त्यामुळेच आज झालेला सुषमा अंधारे यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात यामुळे या घटनेकडे संशयाने पाहिले जात आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!