• Thu. Feb 26th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

अखेर आरोपी जय घरत याला अटक

ByEditor

May 2, 2024

घन:श्याम कडू
उरण :
उरण रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या भीषण अपघातातील आरोपी जय चंद्रहास घरत यास अटक होऊ नये म्हणून जंगजंग पछाडणाऱ्या राजकीय नेत्यांचे मनसुबे धुळीस मिळाले आहेत. काल बुधवार, दि. १ मे या महाराष्ट्र व कामगार दिनी उरण पोलिसांना जय घरत याला अटक करण्यात यश आले आहे. यामुळे जय घरत यास अटक होणारच नाही अशा वल्गना करणाऱ्यांचे चेहरे पांढरे पडले आहेत. न्यायालयाने जय घरत यास ६ दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली आहे.

उरण शहरातील रेल्वे स्थानकासमोर शनिवार, दि. ६ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता क्रेटा कार चालकाने भरधाव वेगात स्कुटरला धडक दिल्याने पती पत्नीचा मृत्यू तर तीन वर्षांची चिमुरडी जबर जखमी होण्याची दुर्दैवी घटना घडली होती. अपघातातील चिमुरडी अद्यापही दवाखान्यात मृत्यूशी झुंज देत आहे. ती आजच्या घडीला मम्मी पप्पा अशी हृदयस्पर्शी आरोळी देत असल्याने ते दृश्य बघून इतर रुग्ण व त्यांचे नातेवाईक हळहळ व्यक्त करीत आहेत. अपघातानंतर दोन दिवसांनी झालेल्या दुर्दैवी घटनेचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये वाहतुक पोलीस व उरण पोलीस वर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्यावेळी आरोपी चालक जय चंद्रहास घरत हा ही तिथे असल्याचे व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे. मग आरोपी पळून जाण्यात यशस्वी झालाच कसा? असा संशय निर्माण होत होता. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी चालक जयचे वडील हे आमदार महेश बालदी यांच्या मर्जीतील असल्याने आरोपीस अटक करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे बोलले जात होते.

याबाबत नुकतीच न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी या घटनेतील फिर्यादी रेल्वे पोलीस राजेंद्र चव्हाण यांनी न्यायालयात व्हिडिओ सादर केल्यानंतर न्यायाधिशांनी पोलिसांवर ताशेरे ओढत तुम्ही कारवाई का केली नाहीत? अशी विचारणा केली. त्यावेळी तपास अधिकारी यांनी आपल्याकडे हे व्हिडीओ नसल्याची कबुली दिली. यावरून पोलिसांचा निष्क्रियपणा अथवा हलगर्जीपणा उघड झाला आहे. यामुळे पोलिसांची नाचक्की झाली होती. न्यायालयाने आरोपी जय घरतचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेला जामीन अर्ज आरोपीच्या वकिलांना मागे घेण्याची नामुष्की आली. यामुळे आरोपीला अटक करण्याशिवाय पर्यायच उरला नाही. यानंतर दि. १ मे रोजी आरोपी जय घरत यास उरण पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपी जय घरत यास दि. ६ मेपर्यंत सहा दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली.

दि. ६ एप्रिलला भीषण अपघात होऊनही आरोपी जय घरत यास अटक करण्यास चालढकलपणा शासकीय यंत्रणेकडून सुरू होता. तसेच उरणमधील काही आजी माजी नगरसेवक मंडळीही मांडवली करण्यासाठी केविलवाणी धडपड करीत होते. तर काही माजी नगराध्यक्ष काही पत्रकारांनी बातम्या दिल्या असल्यातरी जय घरत यास अटक होणार नाही अशा बढाया नाक्यांनाक्यांवर मारीत होते. परंतु, उरणच्या काही जागरूक पत्रकारांनी व अपघातातील प्रमुख साक्षीदार हे आपल्या साक्षीवर ठाम राहिल्याने न्यायालयाने याची दखल घेऊन जय घरत याचा अटकपूर्व जामीनच रद्द केल्याने अटकेशिवाय पर्यायच उरला नव्हता. यामुळे बढाया मारणाऱ्यांचे चेहरे पांढरे पडले असल्याचे दिसत होते.

विशेष म्हणजे अपघातातील मयताचे नातेवाईक, राजकीय पक्ष व त्यांचे नेतेमंडळी यांचे कोणतेही पाठबळ नसतानाही जय घरत यास अटक झाल्याने उरणच्या सर्वसामान्य जनतेतून समाधान व्यक्त केले जात आहे. यामुळे इतरांना नक्कीच यामुळे वचक बसणार असल्याचे बोलले जात आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!