ताम्हिणी घाटातील संरक्षक कठडे कमकुवत झाल्याने सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर
सलीम शेख
माणगाव : माणगाव पुणे महत्वाच्या राज्य मार्गावर ताम्हिणी घाटात तीव्र उतार व त्यातच अवघड वळणे यामुळे दिवसेंदिवस अपघात घडत आहेत. त्याचबरोबर रस्त्याकडेला असणारे संरक्षित कठडे कमकुवत झाले आहेत. त्याचबरोबर रस्त्याकडेला असणाऱ्या दरडींमुळे पर्यटक प्रवाशांना आपला प्रवास असुरक्षित वाटत असून या मार्गावर शासन खास उपयायोजना करीत नाही. त्यामुळे या संरक्षित कठड्यामुळे पुणे मार्गावरून कोकणात येणाऱ्या पर्यटक प्रवाशांचा जीव टांगणीला लागला आहे. पावसाळा जवळ आला असून या मार्गाने प्रवास करणाऱ्या पर्यटकांत लक्षणीय वाढ होणार आहे. यामुळे शासनाने संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी सुरक्षिततेसाठी पाऊल उचलण्याची गरज आहे.
दिघी-पुणे-बँगलोर जाणाऱ्या या मार्गावर दिवसेंदिवस वाहतूक वाढत आहे. पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्याला जोडणारा हा जवळचा मार्ग म्हणून पाहिले जाते. या मार्गावरून पर्यटक प्रवासी मोठ्या प्रमाणात प्रवास करतात. या मार्गावर धोकादायक वळणे व तीव्र उतार असल्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांना या रस्त्याचा अंदाज येत नाही. तसेच रस्त्याकडेला असणारे संरक्षित कठडे हे कमकुवत झाले आहेत. तर कांही ठिकाणी हे कठडे बांधलेले नाही. त्याचबरोबर रस्त्यालगत असणाऱ्या दरडी ह्या विशेषतः पावसाळ्यात कोसळण्याचे प्रमाण वाढते. पावसाळा महिन्यावर येवून ठेपला असून या गंभीर प्रश्नांकडे संबंधित खात्याने लक्ष घालून उपयायोजना करणे गरजेचे आहे. ताम्हाणी घाटातील अवघड धोकादायक वळणे काढून सुलभ व पर्यायी रस्ता काढावा तसेच ज्या ठिकाणी संरक्षक कठडेंची आवश्यकता आहे. तेथे संरक्षक कठडे उभ्या करावेत व कमकुवत झालेले संरक्षण कठडे नव्याने बांधावेत अशी मागणी नागरिक, प्रवासी व पर्यटकातून सतत होत आहे.
ताम्हाणी घाटातील धोकादायक वळणे प्रवाशांच्या मुळावर येत असून ती त्यांच्या जीवावर बेतत आहेत. अनेक वर्षापूर्वी या मार्गावर कांही ठिकाणी संरक्षण भिंती बांधण्यात आल्या होत्या. त्या सध्या कमकुवत झाल्या आहेत. या मार्गांनी अनेक पर्यटक रायगड दर्शनासह कोकण दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात येतात. मुळातच हा मार्ग अनेक ठिकाणी अरुंद आहे. १९९८-९९ मध्ये हा मार्ग खुला करण्यात आला. त्यावेळेस पुणे दिघी हा रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याकडून करण्यात आला होता. त्याला तब्बल २५ वर्षे लोटली, या संरक्षक भिंती आता कमकुवत झाल्या आहेत. या रस्त्याच्या साईडला खोल दऱ्या आहेत. त्यातच हा मार्ग अरुंद आहे. त्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनचालकांना धोका जाणवत आहे. श्रीवर्धन, दिवेआगर, हरिहरेश्वर, माणगावसह दक्षिण रायगड तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, मंडणगड, या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असून ताम्हाणी घाटातील निसर्गरम्य धबधबे तसेच भिरा येथील देवकुंड हे पर्यटकांचे व ट्रेकर यांचे प्रमुख आकर्षण बनल्यामुळे कोकणात येणारे पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे.