अनंत नारंगीकर
उरण : विंधणे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील बोरखार खाडीत सोमवारी ( दि. ६) तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या संदर्भात उरण पोलीसांनी तपास केला असता कल्याण येथील पडघा येथील सदर तरुण असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, विंधणे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील बोरखार खाडी किनाऱ्यावर एक प्रेत आढळून आल्याची माहिती सूत्रांकडून पोलीसांना प्राप्त झाली होती. उरण पोलीसांनी घटनेची माहिती घेऊन खाडी किनाऱ्यावरील स्थळांची पाहणी केली. यावेळी छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह असल्याचे दिसून आले. सदर मृतदेह इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला. त्यावेळी सदर मुत्यूदेहाची माहिती घेण्याचा प्रयत्न पोलीस यंत्रणेने सुरू केला असता कल्याण येथील पडघा येथील मुदत सिंग खोत (वय २२) हा काही अंशी मनोरुग्ण तरुण लग्न सोहळ्यासाठी जातो असे सांगून घरातून बाहेर पडला होता असे त्यांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. सदर मृतदेह मुदत सिंग खोत याचाच असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर घटनेबाबत उरण पोलीस अधिक तपास करीत आहेत.