अब्दुल सोगावकर
सोगाव : ३२ रायगड लोकसभा २०२४ च्या निवडणुकीत मापगाव ग्रामपंचायत हद्दीतील मतदान केंद्रावर सकाळी उन्हामुळे मतदारांचा कमी अधिक प्रमाणात प्रतिसाद होता. मात्र, दुपारनंतर मतदारांनी काही प्रमाणात ऊन कमी झाल्यानंतर मतदान केंद्रावर दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, गरोदर माता, स्तनदा माता, तरुण युवा वर्ग, महिला व पुरुष मतदारांनी एकच गर्दी केल्याचे दिसून आले. यावेळी दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, गरोदर माता व स्तनदा माता यांना मतदानासाठी प्राधान्य देण्यात आले.
यावेळी मतदान केंद्रावर असलेल्या गर्दीचे फोटो काढण्यास पत्रकारांना मज्जाव करण्यात आला. मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांनी आपल्याला वरिष्ठांनी फोटो काढण्यास परवानगी दिली नसल्याचे सांगितले. यामुळे पत्रकारांनी नाराजी व्यक्त केली.
सोगाव येथील मतदान केंद्र क्रमांक ७४ मध्ये संध्याकाळी ६ वाजता एकूण ६५.६९% मतदान झाले. तर मतदान केंद्र क्रमांक ७५ मध्ये ६ वाजता एकूण ६४.५८% मतदान झाले. बहिरोळे येथील मतदान केंद्र क्रमांक ५८ मध्ये एकूण मतदान ७५.४२% झाले तर मतदान केंद्र क्रमांक ५९ मध्ये एकूण मतदान ६५.२% झाले. मापगाव येथील मतदान केंद्र क्रमांक १ मध्ये ७६% मतदान झाले तर मापगाव (मुशेत गाव) मतदान केंद्र क्रमांक २ मध्ये ६५.०८% मतदान झाले.
मतदान केंद्रावर सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे मतदान शांततेत पार पडले.