महाड पोलादपूरमध्ये मतदान प्रक्रिया शांततेत
मिलिंद माने
महाड : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज शांततेत पार पडली. या प्रक्रियेमध्ये लाखो मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. महाड पोलादपूरमधील ३९३ मतदान केंद्रांवर नागरिकांनी उत्सफूर्तपणे मतदान केले.

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा तिसरा टप्पा आज विविध ठिकाणी पार पडला. 32 रायगड लोकसभा मतदारसंघांमध्ये आज सकाळपासून मतदान केंद्रांवर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी गर्दी केली होती. वयोवृद्ध नागरिकांनी देखील मतदानाचा हक्क बजावण्यासाठी हजेरी लावली होती. महाड तालुक्यामध्ये कींजलोळी दाभेकर कोंड येथील वयोवृद्ध नागरिकाचा मतदान करण्यासाठी येत असताना चक्कर येऊन मृत्यू झाला. ही घटना वगळली तर कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. तालुक्यातील सर्वच मतदान केंद्रांवर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. याचबरोबर सीसीटीव्ही यंत्रणा देखील कार्यान्वित करण्यात आली होती.

32 रायगड लोकसभा मतदारसंघातील घेण्यात आलेल्या मतदानासाठी महाड विधानसभा मतदान क्षेत्रामध्ये नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मतदानासाठी नागरिकांनी मिळेल त्या वाहनाने मतदान केंद्र गाठले आणि मतदानाचा हक्क बजावला. सुनील तटकरे आणि अनंत गीते या दोघांमध्येच चुरस असल्याने कार्यकर्त्यांची आपल्या मतदारांना आणण्यासाठी धावपळ सुरू होती. महाड तालुक्यामध्ये दुर्गम गावांमधून देखील वाहनांची सुविधा करण्यात आली होती. महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाच्या एसटी बसेस देखील मोठ्या प्रमाणात घेण्यात आल्या होत्या. दुपारी चार वाजेपर्यंत विविध मतदान केंद्रांवर ४० ते ४५ टक्केच मतदान झाले होते. सकाळी अकरा वाजल्यानंतर उन्हाची तीव्रता वाढू लागली. यामुळे तालुक्यातील अनेक मतदान केंद्रांवर भर दुपारी शुकशुकाट जाणवत होता. मात्र चार वाजल्यानंतर पुन्हा मतदारांची मतदानासाठी धावपळ सुरू झाली.