• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

आरोग्य कर्मचारी राहिले मतदानापासून वंचित

ByEditor

May 7, 2024

मतदान केंद्रावरील प्राथमिक उपचार केंद्रांवर नियुक्ती

मिलिंद माने
महाड :
लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्प्यामध्ये आज मतदान होत असून आरोग्य कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रांवर सुरू केलेल्या प्राथमिक उपचार केंद्रांवर नियुक्ती केल्याने महाड तालुक्यातील अनेक आरोग्य कर्मचारी मतदानापासून वंचित राहिले आहेत.

दिनांक ७ मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात मतदान झाले आहे. या मतदानासाठी लाखो मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावला असला तरी हा हक्क बजावत असताना शासनाच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी मात्र वंचित राहिले आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती यापूर्वी करण्यात आल्या नव्हत्या मात्र यावर्षी मतदानाच्या चार-पाच दिवसांपूर्वी मतदान केंद्रांवर प्राथमिक आरोग्य उपचार केंद्र सुरू करण्याचे आदेश देण्यात आले होते. या आदेशानुसार या मतदान केंद्रांवर प्राथमिक आरोग्य उपचार केंद्र सुरू करण्यात आले. या ठिकाणी आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अचानक आलेल्या या आदेशामुळे नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता आलेला नाही.

एकट्या महाड शहरातील २४ बुथवर २४ कर्मचारी नेमण्यात आले आहेत. महाड विधानसभा मतदारसंघांमध्ये ३९३ मतदान केंद्र आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत असलेल्या मतदान केंद्रांवर आशा सेविका नियुक्त करण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी आशा सेविका उपलब्ध नाहीत त्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राचा कर्मचारी नियुक्त करण्यात आला आहे अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. महाड ग्रामीण रुग्णालयात अंतर्गत महाड शहरामध्ये असलेल्या मतदान केंद्रांवर आरोग्य कर्मचारी नियुक्त केले गेले आहेत. ज्यांचे गाव किंवा मतदान केंद्र जवळ आहे अशा कर्मचाऱ्यांनी मतदान करून नियुक्त केलेल्या मतदान केंद्रावर हजर राहावे असे कळवले होते. मात्र यातील अनेकांना मतदान केंद्र आणि गाव लांब असल्याने मतदान न करता दिलेल्या प्राथमिक उपचार केंद्रांवर हजर राहावे लागले आहे. यामुळे या मतदारसंघातील आरोग्य कर्मचारी मतदानापासून वंचित राहिल्याचे चित्र समोर आले आहे. पोस्टल मतदानाद्वारे मतदान करण्याची सुविधा शासकीय कर्मचाऱ्यांना असते मात्र आरोग्य कर्मचाऱ्यांना नियुक्ती आदेश उशिरा दिला गेल्याने पोस्टल मतदानाची संधी देखील हुकली आहे. यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांममधून नाराजी व्यक्त होत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!