घन:श्याम कडू
उरण : मावळ लोकसभा निवडणुकीची तारीख जशी जवळ येऊ लागली तशी प्रचारात रंगत येऊ लागली आहे. मात्र, उरण परिसरात लोकनेते दि. बा. पाटील यांचा दबदबा आजही कायम असल्याचे दिसत आहे. यामुळेच दोन्ही उमेदवार व त्यांच्या नेते मंडळीकडून त्यांच्या नावाचा वापर करून मतांचा जोगवा मागितला जात आहे.
उरण पनवेल परिसरात आंतरराष्ट्रीय विमानतळ लवकरच सुरू होणार आहे. या विमानतळाच्या नामांतराचा विषय गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावी अशी मागणी लावून धरण्यात आली आहे. सत्तेसाठी हपापलेले नेतेमंडळी दि. बा. पाटील यांच्या नावाचा वापर करून आपला राजकीय स्वार्थ साधत आहेत.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावास संमती देऊन ठराव घेतला होता. त्यानंतर हे सरकार कोसळून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झाले. त्यावेळी त्वरित मुख्यमंत्री शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ठराव नामंजूर करून पुन्हा नव्याने ठराव घेऊन विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देऊ असे सांगितले होते. याला जवळपास एक ते दीड वर्षे उलटूनही अद्यापही नाव काही देण्यात सत्ताधारी महाविकास आघाडी यशस्वी झाली नाही.
लोकसभा निवडणूक जाहीर होऊन मतदान अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे उरण मतदार संघातील मतदारांच्या गळ्यातील ताईत म्हणून समजले जाणारे लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाचा वापर केल्यास आपला उमेदवार निवडून येईल अशी भावना नेतेमंडळी यांची झाल्याने ते त्यांच्या नावाचा वापर करून मतांचा जोगवा मागताना दिसतात.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पनवेल येथे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत लवकरच विमानतळ पूर्ण होऊन त्याचे नामांतर लोकनेते दि. बा. पाटील विमानतळ होईल असा दावा केला तर दुसरीकडे आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनीही आपण निवडून आल्यावर विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी पाठपुरावा करू असे सांगितले. मात्र, गेली अनेक महिने सत्तेत असलेल्या महायुतीच्या नेत्यांना व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देता आले नाही. मग श्रीरंग बारणे हे पुन्हा निवडून आल्यावर तरी नाव देतील का? असा संशय यानिमित्ताने मतदारांना आहे.
या सर्वावरून दोन्ही उमेदवार व त्यांच्या नेते मडळींना लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावांचा वापर करून मतांचा जोगवा हवा आहे. परंतु, त्यांना मनापासून लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे असे वाटत असेल असे दिसत नसल्याची चर्चा उरणच्या मतदारांत सुरू आहे.