• Thu. Feb 26th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरणमधील २५ हजार रहिवाशी पितात अशुद्ध पाणी!

ByEditor

May 8, 2024

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अभियंत्यांचा डोळेझाक कारभार

अनंत नारंगीकर
उरण :
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या अभियंत्यांच्या डोळेझाक कारभारामुळे उरण पूर्व विभागातील २५ हजार रहिवाशांना अशुद्ध पाणी पुरवठ्यावर आपली तहान भागवावी लागत आहे. त्यामुळे रहिवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो अशी भीती रहिवाशी व्यक्त करत आहेत .

उरणच्या पूर्व विभागातील पुनाडे, वशेणी, कडापे, सारडे, पिरकोण, पाणदिवे,पाले, गोवठणे, आवरे,भंगारपाडा या दहा गावांना पुनाडे धरणातून आठ गाव पाणीपुरवठा कमिटीच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो. मे महिन्यात पुनाडे धरणाची पाणीपातळी खालावत असल्याने या परिसरातील रहिवाशांना शुद्ध मुबलक पाणी पुरवठा व्हावा यासाठी केंद्र व राज्य सरकारने सुमारे १० कोटी ८९ लाख रुपये खर्चाची २०२२ ते २०२४ या कालावधीत पुनाडे नळ पाणीपुरवठा योजना ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या देखरेखीखाली राबविण्याचा निर्णय घेतला. मात्र, एम. जी. पी. एल. विभागाचे शाखा अभियंता तथा उप अभियंता प्रशांत पांढरपट्टे यांच्या डोळेझाक कारभारामुळे या योजनेचा ठेका घेणारे कंत्राटदार मे. गोरुर इन्फ्रा प्रा. ली. कंपनीने गावोगावी पाईपलाईनची कामे, जलकुंभ, जलशुद्धीकरण प्रकल्पाची कामे ही संथ गतीने सुरू ठेऊन खर्चाच्या निधीतून रक्कम वसूल करण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे सदर गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून सध्या अशुद्ध पाणी पुरवठ्यावर आपली तहान भागवावी लागत आहे. त्यामुळे रहिवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो अशी भीती सध्या रहिवाशी व्यक्त करत आहेत. यासंदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे शाखा अभियंता तथा उप अभियंता प्रशांत पांढरपट्टे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी ठेकेदाराची पाठराखण करण्याचे काम केले.

धरणाच्या पाण्याने आधीच तळ गाठला आहे. जल शुद्धिकरणाच्या दुरुस्तीचे काम ठेकेदारानी हाती घेतले आहे. सध्या रहिवाशांना पाणी फिल्टर होऊन येत नसल्याने ते गढूळ येत आहे. मात्र, याकडे शासन जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहे.

-प्रसाद पाटील
माजी सरपंच वशेणी

पुनाडे नळ पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून उरण पुर्व विभागातील रहिवाशांना अशुद्ध पाणी पुरवठा सुरू आहे की नाही याची माहिती घेऊन आपणांस कळविण्यात येईल

-समीर वाठारकर
गटविकास अधिकारी, उरण पं. स.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!