• Mon. Jun 30th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

सारळ येथील मतदान केंद्रावर मतदाराला आली चक्कर, वेळीच उपचार मिळाल्याने अनर्थ टळला

ByEditor

May 9, 2024

मतदान केंद्रावरील पेढांबे आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी मदतीला आले धावून

अब्दुल सोगावकर
सोगाव :
रायगड लोकसभा मतदारसंघात ७ एप्रिल २०२४ च्या निवडणुकीच्या वेळी एका मतदाराला चक्कर आल्यामुळे मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना महाड तालुक्यात घडली होती. या घटनेच्या काहीशी मिळतीजुळती घटना अलिबाग तालुक्यातील सारळ येथील मतदान केंद्रावर घडली. मतदानासाठी आलेल्या एका पुरुष मतदाराला अचानक चक्कर आल्यामुळे उपस्थित पेढांबे वैद्यकीय अधिकारी व आरोग्यसेविका, आशा वर्कर यांच्यामध्ये एकच खळबळ उडाली. मात्र, यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र पेढांबे येथील अधिकारी व कर्मचारी यांनी प्रसंगावधान दाखवल्यामुळे पुढील अनर्थ टाळण्यात यश मिळाले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सारळ येथील मतदान केंद्रावर सकाळी अकराच्या सुमारास गणेश गुरुनाथ वाघमारे (37) मतदानासाठी मतदान केंद्रावर आले असता तिथे त्यांना चक्कर आली. यावेळी मतदारांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी निवडणूक आयोगाने उन्हामुळे मतदारांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र पेढांबेच्या वतीने वैद्यकीय पथक तैनात करण्यात आले होते. त्या वैद्यकीय पथकाने तातडीने मतदार रुग्णाची तपासणी करून पुढील उपचारासाठी त्यास रुग्णवाहिकेतून पेढांबे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. काही काळ रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी यांच्या देखरेखीखाली उपचार करून रुग्ण बरा झाल्याची खात्री करून रुग्णास घरी सोडण्यात आले.

यावेळी अलिबाग तालुका आरोग्य अधिकारी अश्विनी सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली समुदाय आरोग्य अधिकारी वसुदेव गुट्टे, वैद्यकीय अधिकारी डॉ. भक्ती पाटील तसेच आशा वर्कर यांनी महत्वाची भूमिका बजावत मतदार रुग्णावर वेळीच उपचार केल्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!