• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

महाड शहरात रहदारीच्या ठिकाणी बसवलेले जाहिरात होर्डिंग्ज धोकादायक!

ByEditor

May 16, 2024

गर्दीच्या ठिकाणी होर्डिंग्ज बसवण्यास परवानगी कोणाची?

मिलिंद माने
महाड :
महाड नगरपरिषदेने शहरात जाहिरातीसाठी दिलेल्या ठेकेदाराकडून शहरात नागरी वस्तीत व भर रहदारीच्या ठिकाणी बसवलेले होर्डिंग्ज नागरिकांसाठी धोकादायक बनले आहेत. भर गर्दीच्या ठिकाणी बसवलेल्या भल्या मोठ्या होर्डिंगकडे नगरपरिषद प्रशासनाने मात्र दुर्लक्ष केले आहे. गर्दीच्या ठिकाणी आणि शाळांच्या परिसरात होर्डिंग लावण्यात परवानगी कोणी दिली? याची चौकशी होणे गरजेचे असून असे धोकादायक होर्डिंग्ज तात्काळ काढून टाकण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

राज्यात पुणे व आता मुंबईत होर्डिंग्ज कोसळून अनेक अपघात आजपर्यंत झाले आहेत. मात्र, तात्पुरती कारवाई करून पुन्हा होर्डिंग्जच्या ठेकेदारांना मोकाट सोडले जात आहे. महाड शहरात होर्डिंग नियमावलीची पायमल्ली करत एकाच ठेकेदाराला पुन्हा पुन्हा जाहिरात करण्याची व त्यातून लाखो रुपये कमावण्याची संधी दिली जात आहे. मात्र, या ठेकेदार कंपनीकडून शहरातील गजबजलेल्या ठिकाणी आणि शालेय परिसरात होर्डिंग लावण्यात आले आहेत. यापूर्वी देण्यात आलेल्या महाड नगरपरिषदेने शहरामध्ये सूचित केलेल्या जागेत होर्डिंग बसवण्याकरता प्रसिद्ध केलेल्या निविदेतून महाड नगरपरिषदेला वर्षाला दहा लाख रुपये करापोटी मिळत आहेत. मात्र, महाड शहरात अनधिकृत बांधकामे आणि वाहतूक व्यवस्था सुधारण्यात नगरपरिषदेला अद्याप यश आलेले नाही. शहरात विविध ठिकाणी उभे केलेले होर्डिंग धोकादायक असून मुंबई, पुण्यासारखी दुर्घटना घडल्यानंतरच त्याकडे लक्ष दिले जाणार आहे का? असा असावा शहरातील नागरिक नगरपरिषद प्रशासनाला विचारत आहेत.

महाडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकातील परिसरात कायम नागरिकांची वर्दळ असते. छत्रपती शिवाजी महाराज चौक हे शहराचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने याठिकाणी रिक्षा, बस, याबरोबरच खाजगी वाहने व अन्य प्रवासी वाहतुकीचे थांबे आहेत. औद्योगिक क्षेत्रातील कामगार देखील या ठिकाणी कामावर जाण्यासाठी गर्दी करून असतात. सद्या शाळा बंद असल्या तरी या ठिकाणी विद्यार्थी वर्गाची देखील ये-जा सुरु असते. महाड नगरपरिषदेच्या मालकीचे गाळे देखील या ठिकाणी असल्याने ग्राहकांची कायम गर्दी असते. अशा ठिकाणी रस्त्यालगत भले मोठे होर्डिंग काही वर्षापूर्वी बसवण्यात आले आहेत.

धनंजय कोळेकर, मुख्याधिकारी महाड नगरपरिषद

महाड नगरपरिषदेच्या मालकी हक्काच्या जागेत ठेकेदाराने बसवलेले होर्डिंग याठिकाणी सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून काम केले असून पालिका प्रशासनाच्या हि बाब निदर्शनास येवू नये हि आश्चर्याची बाब आहे. संबंधित ठेकेदाराने महाड शहरातील शाळा नंबर पाच समोर शाळेच्या आवारातच अशा प्रकारचे होर्डिंग लावले आहे. शाळा सूरू झाल्यानंतर शाळेच्या लहान मुलांसाठी धोकादायक असलेले हे होर्डिंग तत्काळ हटवण्याची गरज आहे. अशाच प्रकारे शहरात विविध ठिकाणी होर्डिंग बसवण्यात आले आहेत.

राज्यात अनेक ठिकाणी होर्डिंग पडून, कोसळून अपघात झालेले आहेत. त्यानंतर शासनाने एक नियमावली तयार केली आहे. मात्र, महाड शहरात या होर्डिंगबाबत नियमावली पायदळी तुडवली गेली आहे. महाड नगरपरिषदेने किती आणि कोणत्या जागा होर्डिंग बसवण्यासाठी ठेकेदाराला नेमून देण्यात आल्या आहेत याबाबत पालिका कर्मचारी बोलण्याचे टाळत आहेत. भर चौकात अशा प्रकारचे होर्डिंग उभे केलेले पालिका अधिकारी आणि प्रशासनाला दिसू नयेत हि आश्चर्याची बाब असल्याचे स्थानिक विक्रेते सांगत आहेत.

महाड शहरात धोकादायक ठिकाणी बसवलेले होर्डिंग मुंबईतील दुर्घटनेनंतर तात्काळ काढून टाकावे अशी मागणी शहरातील नागरिकांकडून महाड नगरपरिषदेच्या प्रशासनाला केली जात आहे. याबाबत महाड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांना विचारले असता संबंधित ठेकेदाराला या होर्डिंगबाबत स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याचा अहवाल दोन ते तीन दिवसात देण्यास सांगितले आहे. स्ट्रक्चरल ऑडिटचा रिपोर्ट आल्यानंतर याबाबत योग्य ती कारवाई केली जाईल असे महाड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांनी सांगितले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!