मिलिंद माने
महाड : महाड एसटी आगाराचा कारभार दिवसेंदिवस ढासळत चालला असून एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा प्रत्यय आज पाहावयास मिळाला. खिडक्यांच्या काचा तुटलेल्या एसटी बसेस प्रवाशांच्या सेवेत वापर करीत असल्याचे उघड झाले आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या महाड आगारात खाजगी एसटी बसेसचा भरणा मोठ्या प्रमाणावर आहे. या गाड्यांची निगा व्यवस्थितरित्या राखली जात नसून अनेक बसेसना टायरच्या स्टेपनी नसतात तर काही बसेस ना प्राथमिक उपचार पेटी देखील नाही. बसेस रस्त्यात बंद पडण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असून त्यातच काही बसेसच्या खिडक्यांच्या काचा फुटलेल्या अवस्थेत पाहावयास मिळत आहेत.
महाड आगारातील एमएच 06 बीडब्ल्यू 8621 व एमएच 06 बीडब्ल्यू 8821 या दोन बसेसच्या खिडक्यांच्या काचा फुटलेल्या असताना देखील त्या बसेस प्रवाशांच्या सेवेत मुंबईसाठी मार्गस्थ करण्याचे काम महाड आगार प्रमुख यांच्याकडून होत असल्याने प्रवाशांची सुरक्षा राम भरोसे असल्याचे यानिमित्ताने उघड झाले आहे. महाड आगारातून या एसटी बसेस प्रवाशांच्या सेवेत धावत असताना व सध्या अवकाळी पाऊस असताना प्रवाशांना पावसाच्या धारा अंगावरच झेलाव्या लागणार आहेत. खाजगी बसेस चालवणारे अनेक चालक एसटी महामंडळाच्या सेवेत रुजू असताना अनेक चालक एसटी महामंडळाचा ड्रेस परिधान न करता एसटी महामंडळाच्या बसेस चालवीत असताना एसटी महामंडळाचे अधिकारी मात्र त्याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करीत आहेत.
एसटी महामंडळाच्या महाड आगारातील खाजगी बसेसमध्ये अनेक वेळा अस्वच्छता आढळते. मात्र, पैसा कमावण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून या खाजगी बसेसची स्वच्छता राखत नसल्याने प्रवाशांचा जीव वेशीवर टांगण्याचे काम खाजगी बस मालक करीत असल्याचे यामुळे पाहण्यास मिळत आहे. ज्या बसेसच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत त्यांची दुरुस्ती कधी होणार? असा सवाल प्रवासी वर्गाकडून विचारला जात आहे. मात्र, याचे कोणतेही उत्तर महाड आगार व्यवस्थापक व त्यांच्या कर्मचाऱ्यांकडे नसल्याचे यावरून दिसत आहे.