घन:श्याम कडू
उरण : उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांची आज तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी न्हावा शेवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी पदभारही स्विकारला आहे. सुनील पाटील यांचीही तडकाफडकी बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी आलेले सतीश निकम यांचीही आज तडकाफडकी बदली करण्यात आल्याने उरणमध्ये अनेक तर्कवितर्क काढले जात आहे.
चिटफंड प्रकरणातील मुख्य आरोपी सतीश गावंड प्रकरणात त्यावेळचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती. त्यांच्या जागी सतीश निकम यांची नियुक्ती करण्यात आली होती. निकम यांनी पदभार स्वीकारून अवघे एक दीड वर्षे झाले असतानाही त्यांची आज तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.
महिना भरापूर्वी उरणमध्ये भीषण अपघात होऊन पती पत्नी ठार तर ४ वर्षांची चिमुरडी जीवन मरणाशी झुंज देत आहे. त्यामधील आरोपी हा पोलीस कर्मचाऱ्यांच्या समोरून त्याचे मित्रमंडळी मोटारसायकल वरून घेऊन गेले होते. त्यांच्यावरही कोणती कारवाई होताना दिसत नाही. त्यानंतर लगेच अपघात स्थळावरून वाहनेही त्वरित हलविण्यात आले होते. याबाबत पत्रकारांनी याची दखल घेऊन वृत्त प्रसिद्ध केल्याने या घटनेचा पर्दाफाश झाला. तसेच घटनेतील साक्षीदार ही ठाम राहिल्याने न्यायालयाने पोलिसांवर ताशेरे ओढल्याने नाईलाजाने आरोपी जय घरत यास अटक करावी लागल्याची चर्चा उरण परिसरात सुरू होती. तसेच इतर प्रकरणातही उरण पोलिसांकडून योग्य ती कारवाई होत नसल्याने जनतेत रोष निर्माण झाला होता. वरिष्ठ पातळीवरून याची दखल घेतल्यानेच सुनील पाटील यांच्या नंतर सतीश निकम यांचीही तडकाफडकी बदली झाल्याने जय घरत यांचे प्रकरणात बदली झाल्याचे अधिकृत सूत्रांकडून समजते. त्यांच्या जागी राजेंद्र कोते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी आज उरण पोलीस ठाण्याचा पदभारही स्वीकारला आहे.
सुनील पाटील यांच्यानंतर आलेले सतीश निकम यांचीही तडकाफडकी बदली झाल्याने उरण पोलीस ठाण्याचे नाव खराब होत चालले असल्याची चर्चा सुरू आहे.