• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

माणगाव एस. एस. निकम इंग्लिश स्कुलचा निकाल १०० टक्के

ByEditor

May 27, 2024

अनुष्का जैन ९८.२० टक्के गुण मिळवून शाळेमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण

सलीम शेख
माणगाव :
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल सोमवार, दि. २७ मे २०२४ रोजी ऑनलाईन जाहीर झाला. या परीक्षेत माणगाव येथील एस. एस. निकम इंग्लिश स्कुलने आपल्या उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे. या शाळेचा दहावी परीक्षेचा एकूण निकाल १०० टक्के लागला असून अनुष्का दिलीप जैन या विद्यार्थिनीने ९८.२० टक्के गुण संपादन करून शाळेमध्ये सर्वप्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान मिळविला आहे.

या शाळेमधून अनुष्का पांडुरंग उभारे या विद्यार्थिनीने ९७.२० टक्के गुण संपादन करून द्वितीय क्रमांक, सनप्रीतसिंग वीरेंद्रसिंग बर्मन या विद्यार्थ्याने ९६.६० टक्के गुण संपादन करून तृतीय क्रमांक, श्रावणी प्रफुल्ल गवळी या विद्यार्थिनीने ९६.४० टक्के इतके गुण संपादन करून चतुर्थ क्रमांक तर मंथन अरुण फराडे या विद्यार्थ्यांने ९६.२० टक्के गुण संपादन करून पाचवा क्रमांक पटकावत शाळेच्या यशामध्ये मानाचा तुरा रोवला आहे. या शाळेमधून यावर्षी दहावी परीक्षेसाठी एकूण ११९ विद्यार्थी बसले होते. हे सर्व विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. त्यापैकी १०३ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य संपादन करून १३ विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर ३ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. या शाळेचा दरवर्षी निकाल उंचावत असल्याने पालकवर्गांमध्ये तसेच विद्यार्थ्यांमध्ये विशेष आनंदाचे वातावरण आहे.

यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे माणगाव एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. मदन निकम, सर्व पदाधिकारी तसेच एस. एस. निकम इंग्लिश स्कुल माणगावच्या प्राचार्या, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक, शाळेचे को-ऑर्डिनेटर, सर्व शिक्षक वर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांनी विशेष अभिनंदन करून विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!