आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश; जीवितहानी नाही
विठ्ठल ममताबादे
उरण : तालुक्यातील कोप्रोली चौकात असलेल्या गुप्ता सॅन्डविचच्या दुकानाला मंगळवार, दि. २८ मे २०२४ रोजी दुपारी २ च्या सुमारास अचानक आग लागली. दुकानातून मोठया प्रमाणात धूर बाहेर पडू लागला. अचानक आग लागली व ज्वाळा भडकू लागल्या. आगीवर नियंत्रण मिळविणे कठीण झाल्याने शेवटी उपस्थित सामाजिक कार्यकर्ते सुदेश पाटील यांनी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना फोन करून संबंधित घटनेची माहिती दिली.
माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी अधिकारी घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले. सदर आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेत एका सिलेंडरचा स्फ़ोट देखील झाला आहे. सदर दुकानात असलेली इलेक्ट्रिक उपकरणे, विविध सामान, वस्तू, अन्न पदार्थ, मशीन, फ्रीज, फॅन, बसण्याचे खुर्च्या टेबल आदी वस्तूंचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. किमान अडीच लाखाहून जास्त किंमतीच्या मालाचे, वस्तूंचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
आम्ही नेहमी मोऱ्यावरून कोप्रोली येथे धंद्यासाठी येत असतो. दुकान भाड्याने घेतले आहे. सॅन्डविच, आईस्क्रीम, ज्यूस तसेच इतर पदार्थ बनवून विकत असतो. दुकानात वायरच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागली आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला पण आग विझली नाही. शेवटी अग्निशमन दलाला बोलवावे लागले. या दुर्घटनेत एक सिलेंडर तसेच विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणे व विविध वस्तू, खुर्च्या टेबल, मशीन, फ्रीज आदी वस्तू जळून खाक झाले. अंदाजे अडीच लाखाहुन जास्त नुकसान झाले आहे. आमची परिस्थिती गरिबीची असून आमच्यावर खूप मोठे संकट कोसळले आहे. आम्ही आता बुडालो. आम्ही बरबाद झालो. आम्हाला आता काहीच सुचत नाही.
-गोविंद गुप्ता
सॅन्डविच दुकान चालक