सृष्टी पाटील उरण तालुक्यात प्रथम
विनायक पाटील
पेण : जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचे पदाजी पांडुरंग मुंबईकर इंग्लिश मिडियम स्कूल, वेश्वी शाळेचा इयत्ता दहावीचा बोर्डाचा निकाल सलग सहाव्या वर्षीही 100 टक्के एवढा लागला. सृष्टी किरण पाटील हिने 96.00% गुण मिळवून संपूर्ण उरण तालुक्यात प्रथम येण्याचा मान पटकावला. हर्ष केशव ठाकूर 86.60% गुण मिळवून शाळेत द्वितीय तसेच विघ्नेश अजित पाटील 86.00% गुण मिळवून तृतीय आला.
शाळेच्या एकूण निकालामध्ये 65 विद्यार्थ्यांपैकी 16 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य तर 44 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी मिळवून घवघवीत यश संपादन केले. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक जे. एम. म्हात्रे, संस्थेचे अध्यक्ष प्रितम म्हात्रे, संस्थेचे सचिव जे. के. मढवी, शाळा समितीचे चेअरमन चंद्रकांत मुंबईकर, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रितम टकले व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका तृप्ती म्हात्रे यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
शहरी भागातील विद्यार्थ्यांसोबतच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी जे. एम. म्हात्रे साहेब यांच्या विचाराने सुरू केलेल्या शाळांमधील निकाल पाहून समाधान वाटते आणि यापुढेही तो सतत वाढण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असे जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचे अध्यक्ष प्रितम म्हात्रे यांनी बोलताना सांगितले.