सलीम शेख
माणगांव : मुंबई-गोवा महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच आहे. माणगांव शहरातील एसटी स्थानकासमोर दुचाकी व टँकरमध्ये अपघात होऊन दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मयत किरण बालाजी झोंबाडे त्याच्या ताब्यातील नंबरप्लेट नसलेली होंडा स्प्लेंडर मोटारसायकल हि अतिवेगाने, हयगयीने, रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालवीत असताना इंदापुर बाजुकडुन लोणेरे बाजुकडे जाणाऱ्या टँकर क्र. एनएल ०१ सीडी २२२७ च्या डाव्या चाकाजवळ मागच्या बाजुला ठोकर मारल्याने अपघात घडला. या अपघातात दुचाकीस्वार किरण झोंबाडे टँकरच्या चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भयानक होता कि दुचाकीस्वाराच्या शरीराचे तुकडे झाले. या अपघाताची नोंद माणगांव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पो. नि. राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स. पो. नि. भोसले करीत आहेत.