• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

नेरळ-कशेळे नवीन काँक्रीट रस्ता खचला!

ByEditor

Jun 27, 2024

रस्त्याच्या बाजूला खोदाई ठरली कारणीभूत?

गणेश पवार
कर्जत :
नेरळ-कशेळे रस्त्याचे काँक्रिटीकरणाचं काम सुरु असताना नवीन रस्ता खचल्याची घटना घडली आहे. रस्त्याच्या बाजूला केबलसाठी खोदाई करण्यात आली होती. या खोदाईमुळे रस्ता खचला असल्याचा आरोप ठेकेदाराने केला आहे. तर तालुक्यात आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून अनेक रस्ते सुसज्ज करण्यात आले असताना याच रस्त्यांच्या साईडपट्टीला पाईपलाईन, केबलसाठी खोदाई केली असल्याने अनेक नवीन रस्त्यांची दुर्दशा झाली असल्याचे याआधी देखील समोर आले होते. दरम्यान खचलेल्या कशेळे रस्त्याबाबत आता सार्वजनिक बांधकाम विभाग काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

भौगोलिकदृष्ट्या कर्जत तालुका पसरलेला आहे. तालुक्यात डोंगर दुर्गम भाग मोठ्या प्रमाणात आहे. तर या भागात जाण्यासाठी रस्त्यांची अवस्था काही विशिष्ट चांगली होती असे देखील नाही. मात्र कर्जत विधानसभा मतदारसंघाची धुरा हातात आल्यावर आमदार महेंद्र थोरवे यांनी तालुक्यातील प्रत्येक रस्त्यावर विशिष्ठ लक्ष तालुक्यातील रस्ते सुस्थितीत आणले. अजूनही अनेक रस्त्यांची कामे सुरु आहेत. त्यापैकी एक म्हणजे नेरळ कशेळे राज्यमार्ग. या रस्त्याच्या काही भागात सिमेंट काँक्रिटीकरणाचं काम सुरु आहे. ज्या ठिकाणी रस्ता वारंवार खराब होतो. त्याठिकाणी सिमेंट काँक्रीटचा रस्ता बनवला जात आहे. या रस्त्याचं काम सुरु असताना दिनांक २६ जून रोजी एक ट्रक गेल्याने हा नवीन कोरा रस्ता खचला आहे. या प्रकारामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मात्र रस्त्याच्या बाजूने केबल टाकण्याचे काम सुरु होते. साईडपट्टीची खोदाई करून संबंधित ठेकेदार माती वरवर ठेऊन निघून गेला त्याचा फटका या रस्त्याला बसला असल्याचा आरोप रस्त्याच्या ठेकेदाराने केला आहे. तेव्हा या प्रकाराने मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.

दरम्यान, तालुक्यात अनेक ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या रस्त्याच्या बाजूने केबल, जल जीवन मिशन योजनेचे पाईपलाईन अशी विविध काम सुरु आहेत. हि काम करताना बांधकाम विभागाकडून परवानगी घेतली जाते. मात्र काम करताना रस्त्याच्या साईडपट्टीत कोडकं केले जाते. मुळात परवानगी हि रस्त्याच्या साईडपट्टी पासून ५ ते १० फुटांवर दिली जाते. मात्र नियम पाळल्यास शेतकरी यांना नुकसान भरपाई द्यावी लागेल म्हणून हि खोदाईची कामे साईडपट्टीवरच केली जात असल्याचे चित्र आहे. तेव्हा आता नेरळ कशेळे रस्त्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग रस्त्याच्या ठेकेदारावर कि केबलसाठी खोदाई केलेल्या ठेकेदारावर कारवाई करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

रस्ता खचला आहे तो आम्ही बनवून देणारच आहोत. पण रस्त्याच्या बाजूने केबलचा खोदाई करण्यात आली होती. जेसीबीच्या साहाय्याने हि खोदाई संबंधित ठेकेदाराने केली होती. आम्ही त्यांना बोललो देखील साईडपट्टीत खोदकाम करू नका तर त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी पुढे केली आणि त्यांचे काम केले. परिणामी आज हा रस्ता खचला आहे. सर्व ठिकाणी अशा प्रकारे मनमानी करून साईडपट्टी खोदली जाते. हे चुकीचं आहे. यामुळे चांगले रस्ते खराब होत आहेत. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष द्यावं

-राजेश जाधव,
नेरळ कशेळे रस्ताचे ठेकेदार.

नेरळ कशेळे येथे सुरु असलेला नवीन रास्ता खचल्याची बाब समजली माझं ठेकेदाराशी बोलणं देखील झालं त्यांनी त्यांची बाजू सांगितली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष पाहणी करून याबाबत निर्णय घेतला जाईल. रस्त्याचे काम उत्तम होईल यासाठी आम्ही देखील कटिबद्ध आहोत. तसेच साईडपट्टीच्या खोदाईबाबत वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. याबाबत परवानगी हि कार्यकारी अभियंता यांच्याकडून जाते.

-संजीव वानखेडे,
उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग कर्जत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!