• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

नागोठणे महावितरणचे सहाय्यक अभियंता वैभव गायकवाड यांची बदली; कर्मचाऱ्यांनी दिल्या शुभेच्छा

ByEditor

Jul 8, 2023

किरण लाड
नागोठणे :
येथील महावितरण खात्याचे सहाय्यक अभियंता वैभव गायकवाड यांची नुकतीच बदली झाली आहे. त्यानिमित्त पाली महावितरण कार्यालयातील कर्मचारी व नागोठणे कार्यालयातील कर्मचारी यांच्यावतीने त्यांना निरोप देऊन त्यांच्या कार्याचा सन्मानपुर्वक सत्कार केला आहे.

नागोठणे महावितरण खात्याचे सहाय्यक अभियंता वैभव गायकवाड यांची कोल्हापूर विभागात बदली झाली आहे. नागोठणे कार्यालयात मागील साडे सात वर्ष ते सहाय्यक अभियंता या पदावर कार्यरत होते. त्यांच्या कार्याचा सत्कार पाली विभाग व नागोठणे विभागातील कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन पाली येथील विभागीय कार्यलयात केला. वयाच्या 22व्या वर्षी नागेठणे येथील एमएसईबी विभागात सहाय्यक कार्यकारी अभियंता या पदावर कार्यरत झाले. नागोठणे विभागात शेतपळस, पळस, निडी, कोंडगाव, आदिवासी वाड्या, ठाकुर वाड्या, वाकण, वझरोली, सुकेळी, बाळसई, वांगणी, आमडोशी, भिसे खिंड, कालकाई, चेराठी, वरवठणे, वेलशेत, आंबेघर, वणी, कडसुरे, कुहीरे, वरच्या वाड्या ही गावे व आदिवासी वाड्या येतात. येथील जनतेला सुरळीत वीज पुरवठा करण्याचे काम आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन त्यांनी गेली सात वर्षे केले. वीज पुरवठा खंडित झाल्यावर तातडीने समस्या सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी विभागात केला आहे.

निसर्ग चक्रीवादळ व फयान वादळाने रायगड जिल्ह्यात हाहाकार माजविला होता. नागोठणे तसेच विभागात ठिकठिकाणी झाडे, लाईटचे पोल, विजेच्या तारा पडुन ठिकठिकाणी विज पुरवठा खंडित झाला होता. परंतु, गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी रात्रंदिवस मेहनत घेवुन विज पुरवठा सुरळीत केला होता. एमएसईबी खाते तसे संवेदनशील पण गायकवाड यांनी अभियंता या नात्याने विभागातील जनतेबरोबर चांगला समन्वय साधण्याचा प्रामणिक प्रयत्न केला. आपल्या सात वर्षाच्या नोकरीच्या कालावधीत लोकांच्या विजेच्या समस्या, विज बिलाबाबत चांगले सहकार्य केले. नागेठणे आयटीआयजवळ लाईटचे काम करतांना त्यांच्या सहकाऱ्याचा दुर्दैवी अंत झाला तेव्हा गायकवाड यांनी तातडीने त्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला वैयक्तीक तसेच सरकारी मदत मिळवून दिली. अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची बदली झाल्याने त्यांच्या कार्याचा यथोचित सन्मान करुन निरोप दिला गेला.

या कार्यक्रम प्रसंगी महावितरण पाली विभागाचे उपकार्यकारी अभियंता जतिन पाटील, राजगी, गवारी, मरगुल आदी अभियंता तसेच नागोठणे व पाली येथील कर्मचारी उपस्थित होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!