प्रतिनिधी
नागोठणे : खासदार संसदरत्न डॉक्टर अमोल कोल्हे यांनी देशाच्या संसदेत केलेल्या हिंदी आणि इंग्रजी भाषणांचा अनुवाद व लेखन नागोठण्याची कन्या प्रज्ञा पोवळे हिने केले आहे.
खासदार कोल्हे यांच्या भाषणावरील ‘शिवनेरीचा छावा’ हे पुस्तक प्रज्ञा पोवळे हीने लिहिले आहे. अत्यंत प्रख्यात असलेल्या सकाळ प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केले असून या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पुण्यातील टिळक स्मारक मंदिर नाट्यगृहात मोठ्या गर्दीत पार पडला. ज्येष्ठ पत्रकार आणि विचारवंत कुमार केतकर यांच्या हस्ते लेखिका आणि एबीपी माझा या वृत्तवाहिनीची वृत्तनिवेदिका प्रज्ञा पोवळे हीचा सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे, निर्भय बनो आंदोलनचे ॲड. असीम सरोदे, सकाळ प्रकाशनचे कार्यकारी संपादक सम्राट फडणीस उपस्थित होते. प्रज्ञा पोवळे या दैनिक सामनाचे मुख्य वृत्त संपादक राजेश पोवळे यांच्या कन्या आहेत.
प्रज्ञा ही ‘एबीपी माझा’मध्ये निवेदिका म्हणून गौरवास्पद व उत्कृष्ट काम करीत असतांना स्वतःची लेखनशैली तिनं जोपासली आहे. त्यासाठी आवश्यक असलेली अभ्यासू वृत्ती, चिकित्सकपणा, ‘ज्ञान’ संपादन करण्याची’ जिज्ञासा, खडतर मेहनत, प्रचंड वाचन हे गुण खूपच आवश्यक असतांना हे सर्व गुण प्रज्ञामध्ये आई-वडीलांकडून उपजत लाभल्याने तिच्याकडून अशा नवनव्या पुस्तकांचे लिखाण होत राहायला हवे अशा शुभेच्छा प्रज्ञाला मान्यवरांकडून देण्यात आल्या.