शनिवार, २८ नोव्हेंबर २०२६ | सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ
ब्रेकिंग न्यूज

काळ नदीच्या प्रदूषणाची अखेर शासनदरबारी दखल; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे चौकशीचे आदेश

माणगावची जीवनवाहिनी असलेल्या काळ नदीतील वाढत्या प्रदूषणाची पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी गंभीर दखल घेतली आहे. अलिबाग व पुणे येथील अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्याचे आणि नदीवरील रासायनिक तवंग तातडीने हटविण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
मुख्य संपादक
गुरुवार, २६ नोव्हेंबर २०२६ | संध्याकाळी ६:०५ ● ६७८ वाचन (Views)
काळ नदीच्या प्रदूषणाची अखेर शासनदरबारी दखल; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे चौकशीचे आदेश
जाहिरात (Advertisement)

अलिबाग व पुणे येथील पथकांकडून होणार तपासणी; नदीवरील रासायनिक तवंग तातडीने हटविण्याचे निर्देश

माणगाव (सलीम शेख)

माणगाव तालुक्याची जीवनवाहिनी आणि हजारो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत असलेल्या काळ नदीतील वाढत्या प्रदूषणाची राज्य शासनाने गंभीर दखल घेतली आहे. नदीच्या पाण्यावर तरंगणारे हिरवट, पिवळसर व लालसर तवंग आणि त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला निर्माण झालेला धोका लक्षात घेता, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच नदीतील दूषित घटक व तवंग तातडीने हटविण्याचे निर्देशही संबंधित यंत्रणांना दिले आहेत.

या गंभीर प्रश्नावर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या पुढाकाराने पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची विशेष भेट घेण्यात आली. या शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते ॲड. राजीव साबळे, माणगावच्या नगराध्यक्षा शर्मिला सुर्वे, शहराध्यक्ष सुनील पवार आणि सर्व नगरसेवक उपस्थित होते. यावेळी काळ नदीची सद्यस्थिती, पिण्याच्या पाण्याची खालावलेली गुणवत्ता आणि संभाव्य जलसंकटाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

माणगाव शहरासह परिसरातील अनेक गावांना काळ नदीतून पाणीपुरवठा होतो. मात्र, सध्या नदीत थेट मिसळणारे सांडपाणी, बांधकामातील सिमेंटमिश्रित पाणी, रासायनिक घटक आणि प्लास्टिक कचऱ्यामुळे नदीचे पात्र प्रदूषित झाले आहे. पाण्याच्या पृष्ठभागावर रासायनिक तवंग जमा झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

या पार्श्वभूमीवर नदीच्या पाण्याची तातडीने वैज्ञानिक तपासणी करावी, प्रदूषणाचे मूळ स्रोत शोधून संबंधितांवर कठोर कारवाई करावी आणि सांडपाण्यावर योग्य प्रक्रिया करावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. या मागणीची दखल घेत पंकजा मुंडे यांनी अलिबाग आणि पुणे येथील आरोग्य व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

पिण्याचे पाणी, शेती आणि पर्यावरणाचा समतोल काळ नदीच्या स्वच्छतेवर अवलंबून आहे. त्यामुळे शासनाच्या या आदेशानंतर आता प्रत्यक्ष पाण्याचे नमुने कधी तपासले जातात आणि प्रदूषण करणाऱ्या घटकांवर काय कारवाई होते, याकडे संपूर्ण माणगावकरांचे लक्ष लागले आहे.
जाहिरात (Advertisement)
ही बातमी आवडल्यास नक्की शेअर करा!

संबंधित बातम्या (Related News)

महाडमध्ये सर्विस रोडवरील अनधिकृत पार्किंगमुळे अपघातांना निमंत्रण; प्रशासनाचे दुर्लक्ष कधी थांबणार?

महाड शहरातील सर्विस रोडलगत बंद अवस्थेतील वाहने आणि ट्रकच्या अनधिकृत पार्किंगमुळे वाहतूक कोंडी व अपघाताचा धोका वाढला असून, यापूर्वी जीवघेणा अपघात होऊनही दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनावर नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

बदलापूरच्या राणी यादव हिच्या शिरपेचात ‘मिस रायगड २०२६’चा मानाचा तुरा

स्वररंग पेण आयोजित १८ व्या पेण फेस्टिवलमध्ये रंगलेल्या ‘मिस रायगड २०२६’ सौंदर्य स्पर्धेत बदलापूरच्या राणी यादव हिने विजेतेपदाचा मानाचा मुकुट पटकावला असून, या दिमाखदार सोहळ्याला आमदार चित्रा वाघ यांनी विशेष उपस्थिती लावली होती.

उरणमध्ये पाण्याचा खेळ की टँकरचा धंदा? रानसई धरण असूनही जनतेच्या घशाला कोरड!

उरण तालुक्यात रानसई धरण असूनही नागरिक आणि आदिवासी वाड्यांवर पाण्यासाठी टँकरची प्रतीक्षा करावी लागत आहे, तर दुसरीकडे कंटेनर यार्डमध्ये पाण्याची उधळपट्टी सुरू असल्याने प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराविरोधात संताप व्यक्त होत असून टँकर पुरवठ्यातील संभाव्य भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी केली जात आहे.

नोकरीच्या आमिषाने फसवणूक; श्रीवर्धन भाजप तालुकाध्यक्षाला दिवेआगरमधून अटक

मुंबई महापालिकेत लिपिक पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून ४.५ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी श्रीवर्धन तालुका भाजप अध्यक्ष आशुतोष पाटील यांना विलेपार्ले पोलिसांनी दिवेआगर येथून ताब्यात घेतले आहे.