शनिवार, २८ नोव्हेंबर २०२६ | सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ
ब्रेकिंग न्यूज

नोकरीच्या आमिषाने फसवणूक; श्रीवर्धन भाजप तालुकाध्यक्षाला दिवेआगरमधून अटक

मुंबई महापालिकेत लिपिक पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून ४.५ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी श्रीवर्धन तालुका भाजप अध्यक्ष आशुतोष पाटील यांना विलेपार्ले पोलिसांनी दिवेआगर येथून ताब्यात घेतले आहे.
संपादकीय मंडळ
शुक्रवार, २७ नोव्हेंबर २०२६ | संध्याकाळी ७:५६ ● ४०० वाचन (Views)
नोकरीच्या आमिषाने फसवणूक; श्रीवर्धन भाजप तालुकाध्यक्षाला दिवेआगरमधून अटक
जाहिरात (Advertisement)

विलेपार्ले पोलिसांची कारवाई; अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर घेतला ताब्यात, राजकीय वर्तुळात खळबळ

श्रीवर्धन (संदेश घोलप)

मुंबई महापालिकेत लिपिक पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून बेरोजगार तरुणांची साडेचार लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी श्रीवर्धन तालुका भाजपचे अध्यक्ष तथा माजी सरपंच आशुतोष अंकुश पाटील यांना विलेपार्ले पोलिसांनी गुरुवारी (दि. २६) सायंकाळी दिवेआगर येथून ताब्यात घेतले. दिंडोशी सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पोलिसांनी ही धडक कारवाई केली. या घटनेमुळे श्रीवर्धन तालुक्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण?

तक्रारदार तेजस राजेश बारगडे यांच्यासह आकाश बारे आणि रोहित बारे या तीन तरुणांना मुंबई महापालिकेत लिपिक पदावर नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. यासाठी या तिघांकडून प्रत्येकी दीड लाख रुपये याप्रमाणे एकूण ४ लाख ५० हजार रुपये घेण्यात आले. मात्र, पैसे देऊनही नोकरी मिळाली नाही आणि घेतलेली रक्कमही परत न केल्याने अखेर मुंबईतील विलेपार्ले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार आशुतोष पाटील व इतर आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ४२० आणि ३४ अन्वये गुन्हा (रजि. क्र. ६९४/२०२४) नोंदवण्यात आला होता.

अटकपूर्व जामीन फेटाळताना न्यायालयाची कठोर निरीक्षणे

अटकेपासून वाचण्यासाठी आशुतोष पाटील यांनी मुंबईतील दिंडोशी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. गोसावी यांनी २९ ऑक्टोबर रोजी हा अर्ज फेटाळून लावला. "बेरोजगारीचा गैरफायदा घेऊन सरकारी नोकरीचे आमिष दाखवण्याचा आरोप अत्यंत गंभीर आहे. तपास अधिकाऱ्यांनी दोन नोटिसा बजावूनही आरोपी तपासासाठी हजर राहिलेला नाही. तसेच, संशयित प्रभावशाली व्यक्ती असल्याने साक्षीदारांवर दबाव येण्याची शक्यता नाकारता येत नाही," असे महत्त्वपूर्ण निरीक्षण न्यायालयाने नोंदवले होते.

राजकीय पडसाद; आणखी फसवणूक झाल्याची चर्चा

आशुतोष पाटील हे विद्यमान भाजप तालुकाध्यक्ष व माजी सरपंच असल्याने या अटकेचे तीव्र राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. "अशा पदाधिकाऱ्यांवर विश्वास कसा ठेवावा?" अशी चर्चा सर्वसामान्य नागरिकांमध्ये रंगली असून, पक्षश्रेष्ठी यावर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सरकारी नोकरीच्या आमिषाने आणखी काही जणांची फसवणूक झाली असल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे. ज्या नागरिकांची फसवणूक झाली असेल त्यांनी व्यवहाराचे पुरावे व कागदपत्रांसह पुढे येऊन पोलिसांकडे रीतसर तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
जाहिरात (Advertisement)
ही बातमी आवडल्यास नक्की शेअर करा!

संबंधित बातम्या (Related News)

महाडमध्ये सर्विस रोडवरील अनधिकृत पार्किंगमुळे अपघातांना निमंत्रण; प्रशासनाचे दुर्लक्ष कधी थांबणार?

महाड शहरातील सर्विस रोडलगत बंद अवस्थेतील वाहने आणि ट्रकच्या अनधिकृत पार्किंगमुळे वाहतूक कोंडी व अपघाताचा धोका वाढला असून, यापूर्वी जीवघेणा अपघात होऊनही दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनावर नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

बदलापूरच्या राणी यादव हिच्या शिरपेचात ‘मिस रायगड २०२६’चा मानाचा तुरा

स्वररंग पेण आयोजित १८ व्या पेण फेस्टिवलमध्ये रंगलेल्या ‘मिस रायगड २०२६’ सौंदर्य स्पर्धेत बदलापूरच्या राणी यादव हिने विजेतेपदाचा मानाचा मुकुट पटकावला असून, या दिमाखदार सोहळ्याला आमदार चित्रा वाघ यांनी विशेष उपस्थिती लावली होती.

उरणमध्ये पाण्याचा खेळ की टँकरचा धंदा? रानसई धरण असूनही जनतेच्या घशाला कोरड!

उरण तालुक्यात रानसई धरण असूनही नागरिक आणि आदिवासी वाड्यांवर पाण्यासाठी टँकरची प्रतीक्षा करावी लागत आहे, तर दुसरीकडे कंटेनर यार्डमध्ये पाण्याची उधळपट्टी सुरू असल्याने प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराविरोधात संताप व्यक्त होत असून टँकर पुरवठ्यातील संभाव्य भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी केली जात आहे.

भुवनेश्वर येथील अनधिकृत बांधकामाविरोधातील उपोषणाचा तिसरा दिवस; मंगेश रावकर यांची प्रकृती खालावली

भुवनेश्वर (ता. रोहा) येथील कुंडलिका नदीपात्रालगतच्या अनधिकृत बांधकामाविरोधात सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा तिसरा दिवस असून मंगेश रावकर यांची प्रकृती खालावली आहे; याप्रकरणी रोहा तहसीलदारांनी पाटबंधारे विभागाला बांधकाम तोडण्याचे पत्र दिले असून लोकप्रतिनिधींनीही तातडीच्या कारवाईचे निर्देश दिले आहेत.