शनिवार, २८ नोव्हेंबर २०२६ | सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ
ब्रेकिंग न्यूज

बदलापूरच्या राणी यादव हिच्या शिरपेचात ‘मिस रायगड २०२६’चा मानाचा तुरा

स्वररंग पेण आयोजित १८ व्या पेण फेस्टिवलमध्ये रंगलेल्या ‘मिस रायगड २०२६’ सौंदर्य स्पर्धेत बदलापूरच्या राणी यादव हिने विजेतेपदाचा मानाचा मुकुट पटकावला असून, या दिमाखदार सोहळ्याला आमदार चित्रा वाघ यांनी विशेष उपस्थिती लावली होती.
संपादकीय मंडळ
शुक्रवार, २७ नोव्हेंबर २०२६ | संध्याकाळी ८:४६ ● २६६ वाचन (Views)
बदलापूरच्या राणी यादव हिच्या शिरपेचात ‘मिस रायगड २०२६’चा मानाचा तुरा
जाहिरात (Advertisement)

स्वररंग पेण आयोजित १८ व्या पेण फेस्टिवलमध्ये दिमाखदार सोहळा; आ. चित्रा वाघ यांची विशेष उपस्थिती, आंचल पाटील प्रथम, तर श्रीजा गुरांग द्वितीय उपविजेती

पेण (विनायक पाटील)

"गणरायाच्या सुंदर आणि सुबक मूर्तींमुळे जागतिक पटलावर स्वतंत्र ओळख निर्माण करणारी पेण नगरी म्हणजे कला आणि संस्कृतीचा अनोखा संगम आहे," अशा शब्दांत भाजपा महिला मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा तथा विधान परिषद सदस्य आमदार चित्रा वाघ यांनी पेणच्या समृद्ध कलावैभवाचे कौतुक केले.

स्वररंग पेण आयोजित १८ व्या पेण फेस्टिवलमधील प्रमुख आकर्षण असलेली ‘मिस रायगड २०२६’ ही सौंदर्य स्पर्धा बुधवारी (दि. २५) पेण नगरपरिषदेच्या मैदानावर मोठ्या दिमाखात पार पडली. सौंदर्य, आत्मविश्वास आणि सादरीकरण कौशल्याचा सुरेख मिलाफ असलेल्या या स्पर्धेत बदलापूरच्या राणी रूपसिंग यादव हिने ‘मिस रायगड २०२६’च्या मानाच्या मुकुटावर आपले नाव कोरले. खालापूरची आंचल पाटील प्रथम उपविजेती, तर पनवेलची श्रीजा गुरांग द्वितीय उपविजेती ठरली.

अठरा वर्षांच्या सातत्यातून कलेचा महाकुंभ : आ. चित्रा वाघ

या सोहळ्याला आमदार चित्रा वाघ यांनी विशेष उपस्थिती लावली. यावेळी बोलताना त्यांनी स्वररंग संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. राजेंद्र साळवी यांच्या अठरा वर्षांच्या सांस्कृतिक कार्याचा विशेष गौरव केला. "रायगडमधील उदयोन्मुख कलावंतांना व्यासपीठ देण्यासाठी प्रा. साळवी यांनी सुरू केलेला हा महोत्सव आज कलेचा महाकुंभ बनला आहे. एखादा उपक्रम सुरू करणे सोपे असते; मात्र तब्बल १८ वर्षे त्याचा दर्जा टिकवून सर्व वयोगटांना सामावून घेणे ही कौतुकास्पद बाब आहे," असे त्या म्हणाल्या. तसेच, स्वररंगच्या नवनिर्वाचित कार्याध्यक्षा अक्षता अथर्व सावंत-साळवी यांच्या नावीन्यपूर्ण संकल्पनांचेही त्यांनी कौतुक केले. या सोहळ्याला पनवेलचे ज्येष्ठ पत्रकार कांतीलाल कडू यांनीही उपस्थित राहून या महोत्सवाने रायगडच्या सांस्कृतिक वैभवात मोठी भर घातल्याचे मत व्यक्त केले.

सतरा सौंदर्यवतींच्या सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध

महाराष्ट्रातील विविध भागांतून आलेल्या १७ स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. पारंपरिक साडी, वेस्टर्न आणि इव्हनिंग गाऊन अशा तीन फेऱ्यांमध्ये रंगलेल्या या स्पर्धेत स्पर्धकांच्या आत्मविश्वासपूर्ण कॅटवॉकने तरुणाईसह उपस्थितांची मने जिंकली. मुंबईचे रूपेश चव्हाण यांनी कोरिओग्राफी केली, तर प्रसिद्ध टीव्ही निवेदक ऋषी देसाई यांनी ओघवत्या शैलीत सूत्रसंचालन केले. ऋचा मोडक, आरती चेंदवणकर, प्रवीण पवार, माधुरी ठाकूर आणि प्रीती निर्मल यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

विशेष पारितोषिकांचे मानकरी :

बेस्ट कॅटवॉक : प्रतिभा वाघमारे (पेण)

बेस्ट पर्सनॅलिटी : सोना मिश्रा

बेस्ट स्माईल : मानसी लोहार

बेस्ट फोटोजेनिक : ऐश्वर्या पेरवी (दादर-पेण)

बेस्ट हेअर : सानिया चौलकर (खारगाव, रोहा)

बेस्ट कॉस्च्युम : विशाखा तोडणकर (रत्नागिरी)

स्पर्धेतील विजेत्यांना आ. चित्रा वाघ, रायगड जिल्हा परिषदेचे कृषी सभापती वैकुंठ पाटील, नगराध्यक्षा प्रितम पाटील, माजी जिल्हाध्यक्षा नीलिमा पाटील, जिल्हाध्यक्षा चित्रा पाटील, शर्मिला पाटील, सभापती स्मिता पेणकर, आफ्रिन अखवारे, ज्येष्ठ पत्रकार कांतीलाल कडू, पेण प्रेस क्लबचे अध्यक्ष देवा पेरवी, स्वररंगचे अध्यक्ष प्रा. राजेंद्र साळवी, कार्याध्यक्षा अक्षता सावंत-साळवी यांच्यासह संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. ‘सर्वांसाठी सर्वकाही’ या संकल्पनेतून सुरू झालेल्या या महोत्सवाला गेल्या १८ वर्षांपासून जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची भावना प्रा. राजेंद्र साळवी यांनी यावेळी व्यक्त केली.
जाहिरात (Advertisement)
ही बातमी आवडल्यास नक्की शेअर करा!

संबंधित बातम्या (Related News)

महाडमध्ये सर्विस रोडवरील अनधिकृत पार्किंगमुळे अपघातांना निमंत्रण; प्रशासनाचे दुर्लक्ष कधी थांबणार?

महाड शहरातील सर्विस रोडलगत बंद अवस्थेतील वाहने आणि ट्रकच्या अनधिकृत पार्किंगमुळे वाहतूक कोंडी व अपघाताचा धोका वाढला असून, यापूर्वी जीवघेणा अपघात होऊनही दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनावर नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

उरणमध्ये पाण्याचा खेळ की टँकरचा धंदा? रानसई धरण असूनही जनतेच्या घशाला कोरड!

उरण तालुक्यात रानसई धरण असूनही नागरिक आणि आदिवासी वाड्यांवर पाण्यासाठी टँकरची प्रतीक्षा करावी लागत आहे, तर दुसरीकडे कंटेनर यार्डमध्ये पाण्याची उधळपट्टी सुरू असल्याने प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराविरोधात संताप व्यक्त होत असून टँकर पुरवठ्यातील संभाव्य भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी केली जात आहे.

नोकरीच्या आमिषाने फसवणूक; श्रीवर्धन भाजप तालुकाध्यक्षाला दिवेआगरमधून अटक

मुंबई महापालिकेत लिपिक पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून ४.५ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी श्रीवर्धन तालुका भाजप अध्यक्ष आशुतोष पाटील यांना विलेपार्ले पोलिसांनी दिवेआगर येथून ताब्यात घेतले आहे.

भुवनेश्वर येथील अनधिकृत बांधकामाविरोधातील उपोषणाचा तिसरा दिवस; मंगेश रावकर यांची प्रकृती खालावली

भुवनेश्वर (ता. रोहा) येथील कुंडलिका नदीपात्रालगतच्या अनधिकृत बांधकामाविरोधात सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा तिसरा दिवस असून मंगेश रावकर यांची प्रकृती खालावली आहे; याप्रकरणी रोहा तहसीलदारांनी पाटबंधारे विभागाला बांधकाम तोडण्याचे पत्र दिले असून लोकप्रतिनिधींनीही तातडीच्या कारवाईचे निर्देश दिले आहेत.