कंटेनर यार्डमध्ये पाण्याची उधळपट्टी, तर आदिवासी वाड्यांवर टँकरची प्रतीक्षा; मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला अधिकाऱ्यांची केराची टोपली
उरण (घनःश्याम कडू)तालुक्यात हक्काचे रानसई धरण असतानाही उरणकरांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याचे विदारक चित्र सध्या पाहायला मिळत आहे. एका बाजूला सर्वसामान्यांच्या घशाला कोरड पडली असून आदिवासी वाड्यांवर दरवर्षी टँकरने पाणीपुरवठा करण्याची नामुष्की येत आहे; तर दुसऱ्या बाजूला कंटेनर यार्ड, सर्व्हिस सेंटर आणि ढाब्यांवर पिण्याच्या पाण्याची सर्रास उधळपट्टी सुरू आहे. प्रशासनाच्या या नियोजनशून्य आणि दुटप्पी कारभारामुळे उरणचा पाणीप्रश्न चांगलाच ऐरणीवर आला असून, टँकर पुरवठ्यातील संभाव्य भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
मुख्यमंत्र्यांचे आदेश कागदावरच राज्यातील संभाव्य दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाणीप्रश्न गांभीर्याने हाताळण्याचे आणि ठोस उपाययोजना राबविण्याचे स्पष्ट निर्देश प्रशासनाला दिले आहेत. मात्र, उरणमध्ये स्थानिक अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या या आदेशांना केराची टोपली दाखवल्याचे दिसत आहे. पाणीटंचाईचे संकट घोंगावत असताना अधिकारी केवळ कागदी घोडे नाचविण्यातच मग्न आहेत. व्यावसायिकांवर मेहेरबानी, सामान्यांच्या नळाला कोरड उरण तालुक्यात अधिकृत आणि अनधिकृत कंटेनर यार्डचे पेव फुटले असून, तेथे नळाच्या पाण्याने कंटेनर धुतले जात असल्याच्या तक्रारी आहेत. याशिवाय सर्व्हिस सेंटर आणि ढाब्यांनाही मुबलक पाणीपुरवठा होत आहे. सर्वसामान्य नागरिकाने एखादी चूक केल्यास तात्काळ कारवाईचा बडगा उगारणारे प्रशासन या व्यावसायिकांपुढे मात्र मूग गिळून गप्प का आहे? या आस्थापनांपैकी किती अधिकृत आहेत आणि पिण्याच्या पाण्याचा व्यावसायिक वापर कोणाच्या वरदहस्ताने सुरू आहे, याची माहिती ग्रामपंचायती, पंचायत समिती आणि एमआयडीसीने जाहीर करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत. टँकर पुरवठ्यात गैरव्यवहाराचा संशय रानसई धरण उशाला असूनही परिसरातील आदिवासी वाड्यांना दरवर्षी टँकरची प्रतीक्षा करावी लागते. कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना राबविण्याऐवजी टँकरवर अवलंबून राहण्याची परिस्थिती जाणीवपूर्वक कायम ठेवली जात असल्याचा गंभीर आरोप आदिवासी बांधवांकडून होत आहे. टँकरच्या फेऱ्यांची नोंद, प्रत्यक्ष पाणीपुरवठा, कंत्राटे आणि खर्चाच्या बिलांची पारदर्शक व स्वतंत्र चौकशी केल्यास मोठा गैरव्यवहार उघडकीस येईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. जलस्रोत संवर्धनाचे प्रस्ताव फाईलीतच बंद उरण शहर व तालुक्यातील जुन्या विहिरी आणि तलावांचे पुनरुज्जीवन करणे, पावसाच्या पाण्याचे संकलन करणे आणि आदिवासी वाड्यांसाठी कायमस्वरूपी योजना राबविण्याबाबत वारंवार पत्रव्यवहार करूनही हे प्रस्ताव लालफितीत अडकून पडले आहेत. परिणामी, पावसाचे पाणी वाहून समुद्राला मिळते आणि उन्हाळ्यात नागरिकांना टँकरच्या दारात उभे राहावे लागते. लोकप्रतिनिधी व आदिवासी बांधवांची आक्रमक भूमिका या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, जुन्या जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करावे आणि पाण्याचा बेकायदेशीर व्यावसायिक वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर आणि कुंदा ठाकूर यांनी केली आहे. तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात जातीने लक्ष घालून उरणच्या पाणीपुरवठा व्यवस्थेची व टँकर कंत्राटांची चौकशी करावी, अशी मागणी आदिवासी बांधवांनी केली आहे. दरवर्षी टँकरची तात्पुरती मलमपट्टी करण्याऐवजी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अन्यथा भीषण पाणीटंचाईच्या उद्रेकाला प्रशासनालाच जबाबदार धरावे लागेल, असा इशारा उरणकरांनी दिला आहे.