रोहा तहसीलदारांचे पाटबंधारे विभागाला कारवाईचे पत्र; पालकमंत्री भरत गोगावले, आ. महेंद्र दळवी यांचे तातडीच्या कारवाईचे निर्देश, तर खा. सुनील तटकरे यांचे बैठकीचे आश्वासन
रोहा (अमोल पेणकर)भुवनेश्वर (ता. रोहा) येथील कुंडलिका नदीपात्रालगतच्या खुल्या जागेत झालेल्या अनधिकृत बांधकामाविरोधात सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा शुक्रवारी तिसरा दिवस होता. अन्नत्यागामुळे उपोषणकर्ते मंगेश अशोक रावकर यांची प्रकृती खालावली असून त्यांना चक्कर व अशक्तपणा जाणवत आहे. मात्र, जोपर्यंत संबंधित अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त केले जात नाही, तोपर्यंत माघार घेणार नसल्याच्या भूमिकेवर रावकर ठाम आहेत. दरम्यान, या प्रकरणाची दखल घेत रोहा तहसीलदारांनी पाटबंधारे विभागाला हे बांधकाम तोडून टाकण्याचे पत्र दिले आहे.
नेमके प्रकरण काय? मौजे भुवनेश्वर येथील स.नं. २४, हि.नं. २१३+४/२ या मिळकतीमध्ये प्रकाश ज. गायकवाड यांनी हे बांधकाम केले आहे. नगर रचना विभागाच्या अहवालानुसार हे बांधकाम मंजूर रेखांकनातील खुल्या जागेमध्ये करण्यात आले आहे. तसेच, ते कुंडलिका नदीपात्रालगतच्या 'ब्ल्यू लाईन' आणि 'रेड लाईन'च्या हद्दीत येत असल्याचे व त्याला नगर रचना (टाऊन प्लॅनिंग) किंवा इतर कोणत्याही विभागाची परवानगी नसल्याचे पाटबंधारे विभागाच्या अहवालात स्पष्ट झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आणि तहसीलदारांचे पत्र कोलाड पाटबंधारे विभागाच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी दि. २१ ऑक्टोबर रोजी या बांधकामावर कारवाई करण्याची विनंती केली होती. त्यानुसार रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी १४ ऑक्टोबर रोजी रोहा तहसीलदार आणि कोलाड पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना लेखी आदेश दिले होते. महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम १९७६ तसेच महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ च्या कलम ५२ ते ५७ नुसार हे बांधकाम निष्कासित करून अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी रोहा तहसीलदारांनी पाटबंधारे विभागाला हे बांधकाम तोडून टाकण्याबाबत पत्र दिले आहे. लोकप्रतिनिधींची दखल; प्रशासनाच्या टोलवाटोलवीवर संताप जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आणि विभागांचे अहवाल असूनही प्रत्यक्ष जागेवर कारवाई न झाल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र संताप व्यक्त होत आहे. "सर्वसामान्य माणसाने एक भिंत बांधली तरी लगेच नोटीस येते, मग नदीपात्रातील या बांधकामावर कारवाईसाठी टोलवाटोलवी का?" असा सवाल रावकर यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, उपोषणाची गंभीर दखल घेत पालकमंत्री भरत गोगावले आणि आमदार महेंद्र दळवी यांनी रोहा तहसीलदारांना तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर, खासदार सुनील तटकरे यांनी रावकर यांच्याशी संपर्क साधून दोन दिवसांत या विषयावर बैठक घेण्याचे आश्वासन देत उपोषण मागे घेण्याची विनंती केली आहे. उपोषणस्थळी नागरिकांची गर्दी उपोषणस्थळी सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने जमा होत असून त्यांनी रावकर यांच्या लढ्याला पाठिंबा दिला आहे. प्रशासनाने कारवाईस आणखी विलंब केल्यास उपोषणकर्त्याच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त केली जात आहे. आता प्रशासन प्रत्यक्षात कधी कारवाई करणार, याकडे संपूर्ण रोहा तालुक्याचे लक्ष लागले आहे.