गुरुवार, २९ ऑक्टोबर २०२६ | सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ
ब्रेकिंग न्यूज

माणगावच्या बल्क ड्रग पार्क प्रकल्पावरून पर्यावरणाचा प्रश्न ऐरणीवर; वृक्षतोड आणि प्रदूषणाच्या शक्यतेने ग्रामस्थांमध्ये चिंता

रायगड जिल्ह्यातील माणगाव-रोहा परिसरात प्रस्तावित बल्क ड्रग पार्क (औषधनिर्मिती प्रकल्प) मुळे कोकणच्या निसर्गाचे जतन आणि औद्योगिकीकरण यांच्यातील समतोलाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
मुख्य संपादक
बुधवार, २८ ऑक्टोबर २०२६ | सकाळी १०:२८ ● २४६ वाचन (Views)
माणगावच्या बल्क ड्रग पार्क प्रकल्पावरून पर्यावरणाचा प्रश्न ऐरणीवर; वृक्षतोड आणि प्रदूषणाच्या शक्यतेने ग्रामस्थांमध्ये चिंता
जाहिरात (Advertisement)

माणगाव (सलीम शेख)

रायगड जिल्ह्यातील माणगाव-रोहा परिसरात प्रस्तावित बल्क ड्रग पार्क (औषधनिर्मिती प्रकल्प) मुळे कोकणच्या निसर्गाचे जतन आणि औद्योगिकीकरण यांच्यातील समतोलाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर जमीन विकसित केली जाणार असल्याने परिसरातील वृक्षसंपदा, सुपीक शेती आणि नैसर्गिक जलस्रोतांच्या भवितव्याबाबत स्थानिक नागरिकांमध्ये मोठी चिंता व्यक्त होत आहे.

प्रकल्पाचा संभाव्य आवाका आणि अनिश्चितता

प्रकल्पासाठी सुमारे पाच हजार एकर क्षेत्र प्रस्तावित असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्ष वृक्षाच्छादित क्षेत्र किती असणार आणि किती झाडे तोडावी लागणार, याची कोणतीही अधिकृत किंवा अंतिम आकडेवारी अद्याप सार्वजनिक झालेली नाही. अंतिम पर्यावरणीय मान्यता मिळाल्यानंतरच वृक्षतोडीचे नेमके स्वरूप आणि आकडा स्पष्ट होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच लाखो झाडांच्या कत्तलीच्या दाव्यांमुळे परिसरात चर्चांना उधाण आले आहे.

ग्रामस्थांचा विरोध आणि प्रमुख मागण्या

माणगाव आणि रोहा तालुक्यांतील २१ गावांमधील शेतकरी व नागरिक या प्रकल्पावर आक्षेप घेत आहेत. संभाव्य रासायनिक प्रदूषण, सांडपाण्याची समस्या, शेतीची नासाडी आणि स्थानिक जीवनशैलीतील बदलांमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता आहे. ग्रामस्थांच्या या शंकांचे निरसन करण्यासाठी वृक्षतोड करण्यापूर्वी प्रत्येक झाडाचे व परिसंस्थेचे शास्त्रीय मूल्यांकन व्हावे, पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन (EIA) अहवाल, जैवविविधतेचे मूल्यांकन आणि वृक्षतोडीचा तपशील नागरिकांसमोर खुला करावा, प्रकल्पाच्या बाजूने व विरोधातील हरकतींची नोंद घेण्यासाठी आणि तज्ज्ञांच्या उपस्थितीत चर्चा घडवून आणण्यासाठी खुली जनसुनावणी घेण्यात यावी या मुद्द्यांवर पारदर्शक कार्यवाहीची मागणी होत आहे.

प्रदूषण नियंत्रणाची कठोर नियमावली गरजेची

बल्क ड्रग पार्कमध्ये होणाऱ्या औषधनिर्मितीमुळे रासायनिक सांडपाणी, घातक अवशेष आणि हवेच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र (CETP), झिरो लिक्विड डिस्चार्ज (ZLD), तसेच भूजल व हवेच्या गुणवत्तेचे सातत्यपूर्ण निरीक्षण करण्याची प्रभावी आणि पारदर्शक यंत्रणा उभी करण्याची मागणी केली जात आहे. केवळ अत्याधुनिक घोषणा न करता, नियमभंग झाल्यास कडक कारवाई होणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. विकासासोबत पर्यावरणाचे रक्षण आवश्यक

औद्योगिक विकासातून रोजगार आणि आर्थिक संधी निर्माण होत असल्या, तरी जुन्या आणि परिपक्व वृक्षसंपदेचे होणारे नुकसान सहजासहजी भरून निघत नाही. नवीन रोपांची लागवड करताना केवळ संख्येपेक्षा रोपांचे जगण्याचे प्रमाण आणि पर्यावरणीय समतोल राखण्यावर भर देणे काळाची गरज आहे. विकास आणि पर्यावरण यांच्यात संघर्ष टाळून शास्त्रीय अभ्यास आणि पारदर्शकतेच्या जोरावर कोकणचा निसर्ग सुरक्षित ठेवला जावा, अशीच सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे.
जाहिरात (Advertisement)
ही बातमी आवडल्यास नक्की शेअर करा!

संबंधित बातम्या (Related News)

वीज कंत्राटी कामगारांचे राज्यव्यापी आंदोलन; २६ जिल्ह्यांतील १० हजार कामगारांचा सहभाग

वेतनवाढ, रोजगार सुरक्षा, कंत्राटदारांची अरेरावी आणि प्रलंबित आर्थिक लाभांच्या मागण्यांसाठी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या (भारतीय मजदूर संघ) वतीने मंगळवारी, २७ ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात आले.

रायगड जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा; माणगावात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अन्नत्याग आंदोलन

कष्टकरी शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आजघडीला आत्महत्येची वेळ आली आहे. शासनाने या गंभीर परिस्थितीकडे लक्ष देऊन संपूर्ण रायगड जिल्हा तातडीने 'दुष्काळग्रस्त' जाहीर करावा, या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातर्फे माणगाव तहसील कार्यालयासमोर बुधवारपासून (दि. २८ ऑक्टोबर) बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

नागोठणे येथे ‘ए सेवेन स्टुडिओ’चा भव्य शुभारंभ!

महिलांच्या फॅशनविश्वात नवनवीन ट्रेंड्स, आकर्षक डिझाइन्स आणि दर्जेदार कपड्यांची मेजवानी घेऊन ‘ए सेवेन स्टुडिओ – Exclusive For Women’ या महिलांसाठीच्या विशेष फॅशन स्टुडिओचा भव्य शुभारंभ नागोठणे येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; पुई हद्दीत टाटा कारच्या धडकेत सायकलस्वाराचा मृत्यू

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील पुई गावच्या हद्दीत इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोर रविवारी (२५ ऑक्टोबर) दुपारी १ वाजेच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी व भीषण अपघात घडला.