माणगाव तालुक्यातील घरोशीवाडी येथे जुन्या घराच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना अचानक स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन कामगारांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे रायगड जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.
माणगाव (सलीम शेख)
रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. जुन्या घराच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना अचानक स्लॅब कोसळल्यामुळे दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे. सोमवार, १६ नोव्हेंबर रोजी दुपारी माणगाव तालुक्यातील घरोशीवाडी परिसरात ही दुर्घटना घडली. या अचानक घडलेल्या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून मृत कामगारांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दुरुस्तीचे काम सुरू असताना घात
जाहिरात (Advertisement)
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, घरोशीवाडी येथे एका जुन्या जुनाट घराचे दुरुस्ती आणि नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. काही कामगार या घराचे छत आणि स्लॅब दुरुस्त करण्याचे काम करत होते. दरम्यान, दुपारच्या सुमारास अचानक घराचा जीर्ण झालेला स्लॅब कोसळला. हा भाग कोसळल्याने काम करत असलेले दोन्ही कामगार ढिगाऱ्याखाली दाबले गेले.
दोन कामगारांचा जागीच मृत्यू
या दुर्घटनेनंतर घटनास्थळी एकच तारांबळ उडाली आणि स्थानिकांनी तातडीने धाव घेत मदतकार्य सुरू केले. परंतु, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. या दुर्दैवी घटनेत दीपक बाजीराव जाधव आणि सचिन बाळाराम कोळी या दोन कामगारांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोन्ही मृतदेह माणगाव उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. याप्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरू असून, जुन्या घरांच्या दुरुस्तीदरम्यान सुरक्षेच्या उपायांकडे होत असलेल्या दुर्लक्षाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.