मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील कोलाड बाजारपेठेत सर्व्हिस रोडच्या दुरवस्थेमुळे धुळीचे साम्राज्य पसरले आहे. या धुळीमुळे व्यापारी, वाहनचालक आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, रखडलेल्या अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण किंवा सिमेंट काँक्रीटीकरण तातडीने करण्याची मागणी होत आहे.
सर्व्हिस रोडचे सिमेंट काँक्रीटीकरण किंवा डांबरीकरण त्वरित करण्याची नागरिकांची मागणी
कोलाड (विश्वास निकम)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील कोलाड बाजारपेठेतील सर्व्हिस रोडच्या दुरवस्थेमुळे सध्या परिसरात मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. या उडणाऱ्या धुळीमुळे वाहनचालक, पादचारी आणि स्थानिक व्यापारी वर्ग प्रचंड त्रस्त झाला असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे संबंधित विभागाने या अंतर्गत रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
आरोग्यासह व्यापारावर परिणाम
जाहिरात (Advertisement)
पावसाळ्यात रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी टाकलेल्या बारीक कच आणि खडीचे आता मोठ्या प्रमाणात धुळीत रूपांतर झाले आहे. वाहनांच्या वर्दळीमुळे ही धूळ हवेत उडून आजूबाजूच्या दुकानांमध्ये शिरत असल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. तसेच, ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या नाकातोंडात धूळ जात असल्याने सर्दी, खोकला आणि श्वसनाच्या विकारांमध्ये वाढ झाली आहे.
रखडलेल्या कामावरून संताप
गेल्या १८ वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम संथगतीने सुरू आहे. या कालावधीत अनेक ठेकेदार बदलले, लोकप्रतिनिधींकडून केवळ आश्वासने आणि तारखा दिल्या गेल्या; मात्र प्रत्यक्षात पळस्पे ते इंदापूर दरम्यानचा रस्ता अद्याप पूर्ण होऊ शकलेला नाही. नियोजनशून्य कारभारामुळे शासनाच्या कोट्यवधी रुपयांचा अपव्यय झाला असून, याला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक विचारत आहेत.
पावसाळा संपून आता हिवाळा सुरू झाल्याने रस्ते दुरुस्तीच्या कामासाठी पोषक वातावरण आहे. तरीही कोलाड बाजारपेठेतील सर्व्हिस रोडच्या कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन सर्व्हिस रोडवर पसरलेली खडी हटवावी आणि या रस्त्याचे कायमस्वरूपी डांबरीकरण किंवा सिमेंट काँक्रीटीकरण करून नागरिकांची धुळीच्या त्रासातून मुक्तता करावी, अशी मागणी जोर धरत आहे.