संगमेश्वर तालुका हौशी कबड्डी असोसिएशनच्या तक्रार अर्जात आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याप्रकरणी असोसिएशनचे सचिव अभिजित सुर्वे यांच्याविरोधात देवरुख पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. समाजसेविका वैदेही सावंत यांच्या कायदेशीर लढ्याला मिळालेल्या या यशामुळे हा विषय राज्यभरात चर्चेत आला आहे.
अन्यायाविरोधातील संघर्षाला बळ मिळाल्याने महाराष्ट्रभरातून वैदेही सावंत यांना वाढता पाठिंबा
देवरुख : संगमेश्वर तालुका हौशी कबड्डी असोसिएशनच्या वतीने करण्यात आलेल्या एका तक्रार अर्जात कथित आक्षेपार्ह व बदनामीकारक मजकूर असल्याप्रकरणी, असोसिएशनचे सचिव अभिजित विजय सुर्वे यांच्याविरोधात देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समाजसेविका सौ. वैदेही सुधीर सावंत यांनी पुकारलेल्या कायदेशीर लढ्याला यामुळे महत्त्वाचे वळण मिळाले असून, हा विषय आता राज्यभरात चर्चेचा विषय ठरला आहे.
वैदेही सावंत या ‘चक्रभेदी सोशल फाउंडेशन’च्या अध्यक्षा असून महिला सक्षमीकरण व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांना महाराष्ट्र शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासह १७ प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
जाहिरात (Advertisement)
संगमेश्वर तालुका हौशी कबड्डी असोसिएशन संलग्न रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने ३ नोव्हेंबर २०२६ रोजी देवरुख पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात एक तक्रार अर्ज देण्यात आला होता. या अर्जातील मजकुरामुळे आपले चारित्र्यहनन झाल्याची, स्त्रीच्या विनयशीलतेचा अपमान झाल्याची आणि सामाजिक प्रतिष्ठेला धक्का पोहोचल्याची भूमिका घेत वैदेही सावंत यांनी ५ नोव्हेंबर रोजी जाहीर निषेध नोंदवला होता. तसेच संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी त्यांनी पोलिसांकडे केली होती.
सदर तक्रार अर्जावर असोसिएशनचे सचिव अभिजित विजय सुर्वे यांची स्वाक्षरी असल्याने, पोलिसांनी कसून चौकशी करत १३ नोव्हेंबर २०२६ रोजी त्यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ७९ आणि ३५६ अन्वये विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मिलिंद किणी आणि पोलीस उपनिरीक्षक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
अन्यायाविरोधातील लढा प्रत्येक महिलेचा आत्मसन्मान: वैदेही सावंत
या कायदेशीर लढ्यात अनुराग उत्तेकर, महेश शिर्के, आशिष घाग, प्रकाश पालांडे, अनिकेत साळवी, 'राधाई फाउंडेशन'च्या राधा लवेकर, राजेश मुल्लाजी, विशाल ढोबळे आणि स्वाती हडकर यांसह अनेक सहकाऱ्यांनी खंबीर पाठिंबा दिला. याबद्दल वैदेही सावंत यांनी विशेष कृतज्ञता व्यक्त केली आहे.
यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, "हा लढा केवळ माझ्या वैयक्तिक प्रतिष्ठेचा नसून, अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या प्रत्येक महिलेच्या आत्मसन्मानाचा आहे. संकटाच्या काळात खंबीरपणे पाठीशी उभी राहिलेली माणसेच खरी ताकद असतात.
संगमेश्वर तालुक्यातून सुरू झालेला हा वाद आता असोसिएशनच्या सचिवाविरोधात गुन्हा दाखल होण्यापर्यंत पोहोचला आहे. पुणे, जालना आणि सांगलीसह महाराष्ट्राच्या विविध भागांतून वैदेही सावंत यांना फोनद्वारे पाठिंबा मिळत असून, या प्रकरणाची राज्यभरात गंभीर चर्चा सुरू आहे.