उरण तालुक्यातील वेश्वी गावाजवळील प्लॅटिनम लॉजिस्टिक गोदामाला लागलेल्या भीषण आगीत ज्वलनशील केमिकलच्या साठ्यामुळे अनेक स्फोट झाले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, गोदामातील अग्निसुरक्षा आणि परवान्यांच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
उरण (घनःश्याम कडू)
उरण तालुक्यातील वेश्वी गावाजवळील 'प्लॅटिनम लॉजिस्टिक'च्या गोदामाला सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास भीषण आग लागली. गोदामात मोठ्या प्रमाणावर ज्वलनशील केमिकलचा साठा असल्यामुळे आगीदरम्यान एकापाठोपाठ एक अनेक स्फोट झाले, ज्यामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला. आगीच्या भल्यामोठ्या ज्वाळा आणि आकाशात पसरलेल्या काळ्याकुट्ट धुराच्या लोटांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, धुरामुळे काही रहिवाशांना श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला आहे.
प्रशासकीय यंत्रणा आणि मदतकार्य
जाहिरात (Advertisement)
घटनेची माहिती मिळताच सिडको आणि पनवेल महानगरपालिकेचे अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जवानांकडून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर यांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आणि परिसरातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हालवण्याच्या सूचना दिल्या.
प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह
स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, याच गोदामाला यापूर्वीही भीषण आग लागली होती. त्यामुळे मागील घटनेनंतर प्रशासनाने कोणती चौकशी केली, कोणावर कारवाई केली आणि गोदामाचे अग्निसुरक्षा ऑडिट झाले होते का, असे गंभीर सवाल आता उपस्थित होत आहेत. एकाच गोदामात वारंवार आग लागण्याच्या घटना घडत असल्याने तपासणी यंत्रणेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
ग्रामस्थांकडून कठोर कारवाईची मागणी
गोदामामध्ये अतिज्वलनशील रासायनिक पदार्थ साठवण्याचा अधिकृत परवाना होता का, फायर एनओसी व अग्निसुरक्षेच्या नियमांचे पालन केले होते का, आणि हे गोदाम अधिकृत आहे की अनधिकृत, याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. नियमबाह्य साठवणूक आढळल्यास गोदाम मालक आणि संबंधित दोषींवर कठोर फौजदारी कारवाई करावी, अशी आक्रमक मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
उरण तालुक्यातील विविध ग्रामपंचायत हद्दींमध्ये अनधिकृत कंटेनर यार्ड आणि गोदामांचे पेव फुटले आहे. वारंवार घडणाऱ्या अशा दुर्घटनांमुळे नागरिकांच्या जीविताला मोठा धोका निर्माण झाला असून, या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून गोदामाचे परवाने, केमिकल साठा व सुरक्षाव्यवस्थेची सखोल तपासणी करण्याची मागणी जोर धरत आहे.