कुणाचे बाळ कडेवर घेतले म्हणून ते आपले होत नाही! त्याचप्रमाणे दुसऱ्याने केलेल्या कामाचे श्रेय लाटून कोणी त्या कामाचा जनक होत नाही, अशा शब्दांत उरणच्या नगराध्यक्षा भावना घाणेकर यांनी भाजप आमदार महेश बालदी यांच्यासह श्रेयवादाच्या राजकारणावर जोरदार प्रहार केला. १८ वर्षांच्या संघर्षातून साकारलेल्या उरण बायपासचे श्रेय उपटू पाहणाऱ्या कोत्या मनाच्या राजकीय मंडळींना २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत उरणची जनता राजकीय बायपास करेल, असा सज्जड इशाराही त्यांनी दिला.
उरणचा बहुप्रतीक्षित बायपास म्हणजे एका दिवसात उभा राहिलेला राजकीय जाहिरात फलक नव्हे! तब्बल १८ वर्षांच्या संघर्षाची, पाठपुराव्याची आणि जनआंदोलनाची ती फलश्रुती आहे. ५३ कोटी रुपये खर्चाच्या या बायपासची संकल्पना मांडून सातत्याने पाठपुरावा करणारे उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दृश्य प्रणालीद्वारे झालेल्या उद्घाटन कार्यक्रमात साधा नामोल्लेखही करण्यात आला नाही. उलट या कामाचे श्रेय घेण्याच्या प्रयत्नांमुळे उरणकरांमध्ये नाराजी पसरली. ज्यांनी १८ वर्षे संघर्ष केला ते पडद्याआड आणि श्रेय घेणारे पुढे, या प्रकाराला उत्तर देण्यासाठी संतप्त उरणकरांनी थेट बायपास मार्गावरच गोपाळ पाटील यांचा जाहीर नागरी सत्कार आयोजित केला. उरण सामाजिक संस्था, आधार सावली फाऊंडेशन, उरण उत्कर्ष समिती, युवा सामाजिक संस्था आणि उरण तालुका चेस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (३१ ऑक्टोबर) सायंकाळी हा नागरी सत्कार सोहळा पार पडला. हा केवळ सत्कार नव्हता, तर १८ वर्षांच्या संघर्षाची दखल घेण्याबरोबरच श्रेयवादाच्या राजकारणाला दिलेले उत्तर होते. उरण पंचायत समितीचे सभापती महेश म्हात्रे यांनी गोपाळ पाटील यांच्या संघर्षाचा लेखाजोखा मांडताना श्रेयवाद्यांना चांगलेच सुनावले. कबड्डीपटू, राजकारणी, नाट्यकलाकार, गायक आणि समाजसेवक अशा अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाच्या गोपाळ पाटील यांनी बायपाससाठी १८ वर्षे सातत्याने पाठपुरावा केला. श्रेयासाठी झळकणारे पोस्टर आणि बॅनर दोन दिवसांत उतरतील; मात्र गोपाळ पाटील यांचा संघर्ष उरणच्या जनतेच्या स्मरणातून कधीच उतरणार नाही, असा टोला त्यांनी लगावला. लोकप्रतिनिधींपेक्षाही मोठे काम गोपाळ पाटील यांनी केले असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले. बायपासचा प्रश्न अद्याप संपलेला नाही. नगरपरिषदेच्या हद्दीतील उर्वरित ४०० मीटरचा रस्ता सुमारे १३ कोटींच्या निधीअभावी रखडला आहे. नगरपरिषदेच्या कारभारावर टीका करत या अपूर्ण रस्त्यासाठी पुन्हा संघर्ष करावा लागणार असल्याचे महेश म्हात्रे यांनी स्पष्ट केले. जनतेच्या आणि संघटनेच्या लढ्यात गोपाळ पाटील यांच्यासोबत उतरण्याची तयारीही त्यांनी दर्शवली..
एवढ्यावरच न थांबता महेश म्हात्रे यांनी उरण शहरातील दिवसेंदिवस गंभीर होत चाललेल्या वाहतूक कोंडीच्या प्रश्नाकडेही लक्ष वेधले. शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी पत्रकारांनी पुढाकार घेऊन गोपाळ पाटील यांना या लढ्यात सहभागी होण्यासाठी आवाहन करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. बायपाससाठी १८ वर्षे संघर्ष करणाऱ्या गोपाळ पाटील यांनी आता उरण शहरातील वाहतूक कोंडीच्या प्रश्नावरही पुढाकार घ्यावा, अशी सादच त्यांनी यावेळी घातली. सत्काराला उत्तर देताना गोपाळ पाटील यांनी श्रेयाच्या राजकारणावर जोरदार प्रहार केला. आपण केलेले काम पडद्याआड जाऊ नये आणि दुसऱ्यांच्या कामावर स्वतःची नावाची पाटी ठोकू पाहणाऱ्यांना पायबंद बसावा, यासाठीच नागरी सत्कार स्वीकारल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. या १८ वर्षांच्या संघर्षात तत्कालीन पालकमंत्री सुनील तटकरे, सिडकोचे तत्कालीन अध्यक्ष प्रमोद हिंदुराव, बकुल पाटील आणि सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या लढ्यात उरणमधील नागरिक आणि पत्रकारांचाही मोलाचा वाटा असल्याची प्रांजळ कबुली त्यांनी दिली. नगरपरिषदेच्या हद्दीतील उर्वरित ४०० मीटरचा रस्ता पूर्ण करण्यासाठी पुन्हा संघर्षाची वेळ आली तरी मागे हटणार नाही, असा निर्धार गोपाळ पाटील यांनी व्यक्त केला. जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवताना आपला मूळ आक्रमक स्वभाव बदलणार नाही, असे ठणकावत गायकापेक्षा समाजसेवकाचा शिक्का आपल्याला अधिक प्रिय असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, उरण तालुका चेस असोसिएशनचे अध्यक्ष संदीप पाटील, उरण बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. विजय पाटील, कामगार नेते तथा माजी जेएनपीए कामगार ट्रस्टी भूषण पाटील यांनीही श्रेयवादाच्या राजकारणावर जोरदार टीका केली. खोपटा खाडी पुलाच्या जोडरस्त्यासाठी केलेले श्रमदान, करळ रेल्वे फाटक बंद करण्याच्या विरोधातील रेल्वे रोको आंदोलन, करळ उड्डाणपुलासाठी दिलेला न्यायालयीन लढा आणि उरण बायपाससाठी केलेला प्रदीर्घ संघर्ष अशा अनेक लढ्यांच्या आठवणींना यावेळी उजाळा देण्यात आला. या प्रसंगी आधार सावली फाऊंडेशनच्या अध्यक्षा रेश्मा म्हात्रे, उरण उत्कर्ष समितीचे दीपक गावंड, युवा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष हर्षल ठाकूर, कोमसापचे अध्यक्ष एल. बी. पाटील, शेकाप तालुका चिटणीस रवींद्र घरत, संतोष पवार, शिक्षक नेते दा. चां. कडू, अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या हेमलता पाटील यांच्यासह गोपाळ पाटील यांचे चाहते, हितचिंतक आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.