दैव बलवत्तर म्हणून जीवितहानी टळली
अब्दुल सोगावकर
सोगाव : अलिबाग आगाराची सोमवारी सकाळी ८ वाजता सुटलेली अलिबाग पनवेल ही बस कार्लेखिंडीतील अवघड वळणावर साडेआठ वाजण्याच्या सुमारास बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळे व समोरून आलेल्या एसटी बसला वाचविण्याच्या प्रयत्नात असताना रस्त्याच्या कडेला कलांडून अपघात झाला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी न होता दोन महिला प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत.या अपघाताबाबतची माहिती अलिबाग पोलिसांना मिळताच बिट मार्शल पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तत्पूर्वी स्थानिक नागरिकांच्या व इतर वाहनचालकांच्या मदतीने बसमधील प्रवाशांना बाहेर काढले, यातील काही जखमी झालेल्या प्रवाशांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार सकाळी आठ वाजता सुटलेली अलिबाग पनवेल बस कार्लेखिंडीतील अवघड वळणावर आली असताना बसचे ब्रेक निकामी झाल्याचे चालक निलेश घरत यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी प्रसंगावधान दाखवत बस नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचवेळी समोरून आलेल्या एसटी बसला वाचवण्याच्या प्रयत्नात बस रस्त्याच्या कडेला असलेल्या रेलिंगला धडकली. नशिब बलवत्तर म्हणून त्या रेलिंगमुळे व त्याठिकाणी रस्त्याच्या कडेला असलेल्या आंब्याच्या झाडामुळे सदर बस अडकून राहिली. अन्यथा बस डोंगराच्या खाली कलांडुन मोठा अनर्थ घडला असता. यावेळी बसमध्ये ५० ते ५२ प्रवाशी होते. त्यातील काही प्रवाशांना मुका मार लागला तर दोन महिला प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. अपघातानंतर प्रवाशांमध्ये भीतीचे व चिंतेचे वातावरण होते.
यावेळी बसमधील प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी बोलताना सांगितले की, राज्य परिवहन महामंडळाच्या हलगर्जीपणामुळे आज आमच्या जीवावर भयानक संकट आले होते. सुदैवाने थोडक्यात निभावले. मागील काही काळापासून अलिबाग आगाराच्या बसेस रस्त्यांवर नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. आज सकाळी आगारातून निघालेली बस फक्त सात ते आठ किलोमीटर अंतरावर आली असताना बसचे ब्रेक निकामी होतात, हा प्रशासनाचा निव्वळ हलगर्जीपणा व निष्काळजीपणा आहे. सुटणाऱ्या प्रत्येक बस सुस्थितीत असल्याची तपासून खात्री करणे गरजेचे असताना त्या तशाच मार्गस्थ करत असल्याचे अनेकदा उघडकीस आले आहे. हे प्रवाशांच्या जीवाशी खेळ खेळत आहेत असे सांगत संताप व्यक्त केला आहे.
या अपघाताबाबत अधिक माहितीसाठी आगारप्रमुख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. सदर अपघात हा पोयनाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने अधिक तपास पोयनाड पोलीस करीत आहेत.