“कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुखांना निलंबित करा व जिल्हाधिकाऱ्यांची बदली करा”
मिलिंद माने
मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड येथील हल्ल्यात जखमी झालेले रहिवाशी व जखमी झालेले पोलीस व मालमत्तेचे झालेले नुकसान यातून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला गेला. त्यामुळे हा हल्ला पूर्वनियोजित होता का? अतिक्रमणे हटवण्याच्या नावाखाली हल्ले करणारे कोण आहेत? ते कोणत्या संघटनांशी जोडले आहेत? त्यांचा बोलविता धनी कोण आहे? याचा सरकारने तपास करावा व या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी आढळणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारताना रयतेला पुरोगामी विचार दिला या पुरोगामी विचारांची जपणूक करत राजश्री शाहू महाराजांनी कोल्हापूर येथे सामाजिक न्यायाचा पाया रचला. सामाजिक न्यायाचे जनक अशी राजश्री शाहू महाराजांची ओळख आहे. असं असताना कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड येथे अतिक्रमण हटवण्याचा मुद्दा उपस्थित करून केलेली तोडफोड पुरोगामी महाराष्ट्राला शोभा देणारी नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या किल्ल्यावरच विशिष्ट समाजाला लक्ष केले याचा अर्थ हल्लेखोरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांशी जाणीवपूर्वक प्रतारणा केली आहे. अतिक्रमणाच्या नावाखाली घरांची तोडफोड केली. कायदा हातात घेतला. समाजकंटकांचा हा समाज विघातक विचारच पुरोगामी महाराष्ट्रासाठी घातक आहे. सरकारने अशा समाजकंटकांना वेळीच वेसण घातली पाहिजे, अन्यथा महाराष्ट्रातील सौहार्दपूर्ण वातावरण दूषित होण्याचा धोका आहे. एखादा समाजाला सतत भीतीच्या शाळेत जगावं लागतं हे या सरकारचं अपयश आहे. त्यामुळे मोकाट समाजकंटकांना सरकारने वेळीच जेरबंद केले पाहिजे असा उल्लेख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविलेल्या पत्रामध्ये केला आहे.
विशिष्ट समाजाला लक्ष करून हल्ले करण्याच्या घटना राज्यात वारंवार होत आहेत. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सरकारने कठोर पावले उचलावीत, राज्यातील कायदा सुव्यवस्था भक्कम असेल तर समाजकंटकांना जरब बसणार आहे. त्याचबरोबर अचानक झालेल्या हल्ल्यामुळे भयभीत झालेल्या समाजाला सरकारने विश्वासात घेऊन आधार द्यावा, नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली असून याबाबत सरकारने उच्चस्तरीय चौकशी करून दोषी आढळण्यावर कठोर कारवाई करावी तसेच कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुखांना तात्काळ निलंबित करून कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांची तात्काळ बदली करावी अशी मागणी त्यांनी त्या पत्राद्वारे केली आहे.
