शशिकांत मोरे
धाटाव : रोहा तालुक्यातील शेणवई गावचे सामाजिक कार्यकर्ते यशवंत देशमुख (भाई) यांना नुकतीच वृद्धापकाळाने देवाज्ञा झाली. वयाच्या ८५व्या वर्षी त्यांची शेणवई येथील त्यांच्या निवासस्थानी रात्री प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे पंचक्रोशीत वातावरण शोकाकुल झाले आहे. त्यांच्या अंत्ययात्रेसमयी प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता.
यशवंत दौलतराव देशमुख यांना गावात भाई नावानेच संबोधले जात होते. स्वतः शिक्षक असल्याने शिक्षणाचे महत्व समजून गावात पहिल्यांदा शाळा सुरू करण्यात त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यांना साहित्य वाचनाची प्रचंड आवड होती. सामाजिक जीवनात आर्थिक बाजू सक्षम राहण्याच्या हेतूने बचतीचा मार्ग म्हणून त्यांनी विभागासाठी पोस्ट ऑफिस सुरू केले. सामाजिक सेवा करीत असताना धार्मिक कार्याची आवड असल्याने भावफेरीच्या माध्यमातून त्यांनी स्वाध्यायी विचार घराघरात आणि माणसा माणसापर्यंत पोहचविण्याचे काम केले. दिवंगत हेमंत देशमुख यांचे तर सामाजिक कार्यकर्ते उदय देशमुख, आदर्श शिक्षिका उज्वला गोळे यांचे ते वडील होत. त्यांनी मुलांवर, सूना, नातवडांवर चांगले संस्कार केले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सूना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. असंख्य नातेवाईक, चाहत्यांच्या उपस्थितीत श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करून त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांचे दशक्रिया विधी शनिवार, दि. २७ जुलै तर उत्तरकार्य विधी मंगळवार, दि. ३० जुलै रोजी शेणवई येथे करण्यात येणार असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.