विश्वास निकम
कोलाड : कोलाड पोलीस ठाण्याच्या पथकाने शनिवारी रात्री भिरा फाटा येथे कारवाई करून गुटखा वाहतूक करणाऱ्यास ताब्यात घेत ब्रेजा कारसह १० लाख १८ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत धडक करावाई केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, शनिवार, दि. २० जुलै २०२४ रोजी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास कोलाड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मोहिते, पोलीस उपनिरीक्षक नितीन चौधरी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नरेश पाटील, पोलीस हवालदार कृष्णा म्हात्रे, पोलीस शिपाई डी. एन. पांचाळ यांचे पथकाने पेट्रोलिंग दरम्यान भिराफाटा ते विले जाणाऱ्या रस्त्यावर भिरा फाटा येथे ब्रेजा कार क्रमांक एमएच १२ एमडब्ल्यू ७१७३ वर कारवाई करीत १ लाख १८ हजार ३२० रुपये किमतीचा विमल गुटखा व विमल पान मसाला कोलाडच्या दिशेने घेऊन येताना अजय उखाराम चौधरी (वय २९ मूळ राहणार सोजत तालुका जिल्हा पाली राजस्थान, सध्या राहणार खेड शिवापुर पुणे) यास ताब्यात घेतले असून त्याचे विरुद्ध कोलाड पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर ६५/२०२४ भा. न्या. स. क. १२३, २२३,२७४, २७५,३(५) व अन्नसुरक्षा मानके कायदा २००६ चे कलम ३०(२)(अ), ३१(१), २६(२)(१), २६(२)(iv) अन्न सुरक्षा मानके कायदा प्रोविबिशन अँड इलेक्ट्रिशन ऑन सेल नियमन २०११ चे कलम २,३,४अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्यामध्ये ब्रिझा गाडीसह प्रतिबंधित विमल गुटखा व तंबाखू असा १० लाख १८ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर बाबत सहा. पोलीस उपनिरीक्षक नरेश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास कोलाड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नितीन चौधरी हे करीत आहेत. सदरची धडाकेबाज कामगिरी केल्याबाबत परिसरातून कोलाड पोलिसांवर अभिनंदनचा वर्षाव केला जात आहे.