अनंत नारंगीकर
उरण : पिरकोण – सारडे रस्त्यावर तरुणाचा मृतदेह शुक्रवारी (दि. १९) आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या संदर्भात उरण पोलीसांनी तपास केला असता पनवेल तालुक्यातील कळवणे गावातील रहिवासी राजेश हरिदास ठाकूर ह्या तरुणाचा मृतदेह असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार राजेश हरिदास ठाकूर (वय ४०) हा तरुण आपली पत्नी व तीन लहान मुलींसोबत केळवणे या आपल्या गावात राहत असून आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी जेएनपीए बंदर परिसरात कॅन्टीनचा व्यवसाय करत होता. शुक्रवारी (दि. १९) राजेश हा आपल्या घराकडे रात्री ८.४५ च्या सुमारास आपल्या मोटारसायकलवरून निघाला होता. ९ च्या सुमारास राजेशला त्यांच्या पत्नीने मोबाइलद्वारे फोन केला होता. त्यावेळी राजेश कोप्रोली नाक्यावर सामान घेत असल्याचे त्यांनी आपल्या पत्नीला सांगितले. परंतु बराच वेळ होऊनही आपला पती राजेश घरी का आला नाही याची माहिती आपल्या नातेवाईकांना राजेशच्या पत्नीने दिली. नातेवाईकांनी शोध घेतला असता राजेशची मोटारसायकल सारडे रस्त्यावर पडलेल्या अवस्थेत तसेच सामान अस्ताव्यस्त पडलेले आढळून आले. तसेच रस्त्याच्या कडेला राजेश पडलेल्या अवस्थेत आढळून आला.
या घटनेची माहिती नातेवाईकांनी उरण पोलीसांना दिली असता उरण पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन सदर जागेचा पंचनामा करून राजेशला इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता राजेश हा मयत झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. मात्र राजेश ठाकूर यांचा मुत्यू कशामुळे झाला यासंदर्भात तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.
राजेश ठाकूर या तरुणाचा मृत्यू हा विषारी द्रव्ये किंवा इतर बाबींमुळे कि इतर कारणांमुळे झाला आहे याचा तपास पोलीस यंत्रणा करत आहेत.
-राजेंद्र कोते
वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उरण