विळे वरचीवाडीतील घटना, माणगाव पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद
सलीम शेख
माणगाव : आपल्या मूळ गावी नातेवाईकांसोबत मोबाईलवरून बोलण्यासाठी बिल्डींगचे टेरीसवर गेलेल्या ३२ वर्षाच्या तरुणाचा तोल जाऊन तो खाली जमीनीवर पडू त्यास गंभीर दुखापत झाल्याने त्याला माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना त्याचा मृत्यू झाल्याची घटना माणगाव तालुक्यातील विळे वरची वाडी येथे घडली. या घटनेची माहिती माणगाव पोलीस ठाण्यास समजतात माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांनी तात्काळ आपल्या पोलीस सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली.
याचे सविस्तर वृत्त असे की, माणगाव तालुक्यातील विळे वरची वाडी येथे सिध्दीविनायक बिल्डींगमध्ये राकेश भक्तीपदा संत्रा (वय ३२, मुळ रा. मधुबन, पो. काणकटाबटटी, ता. कोतुलपुर, जि. बनकुरा, रा. पश्चिम बंगाल) हा राहत होता. ता. २० जुलै २०२४ रोजी सायंकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास गावाकडील घरातील नातेवाईकांसोबत बोलण्यासाठी राकेश सिद्धिविनायक बिल्डिंगचे टेरेसवर गेला आणि मोबाईलवर बोलत असताना त्याचा तोल जाऊन तो खाली जमिनीवर पडला. त्यास उपचाराकरीता उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे दाखल केले असता तेथे औषधोपचार चालु असताना त्याचा मृत्यू झाला. अशी खबर माणगाव पोलीस ठाण्यात बिमलेश जयराम यादव (वय ४० वर्षे व्यवसाय वेल्डर काम सध्या रा. सिध्दीविनायक बिल्डींग विळे वरचीवाडी ता माणगांव जि रायगड मुळ रा. बिरोल पो बिरोल ता खजवली जि मधुबन्नी रा. बिहार) यांनी दिली. त्यानुसार माणगाव पोलीस ठाण्यात या घटनेची आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पवार अधिक तपास करीत आहेत.